वरळी बीडीडीवासीयांचे गृहस्वप्न साकार, रहिवाशांना आनंदाश्रू अनावर; शिवसेनेने केले वचन पूर्ण, शंभर वर्षांनंतर चाळीतून टॉवरमध्ये

वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 रहिवाशांना गुरुवारी आपल्या हक्काच्या घराचा ताबा मिळाला. गेली शंभर वर्षे तीन ते चार पिढय़ांपासून 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटाच्या आलिशान घरात राहण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. हक्काच्या घराचा ताबा घेताना अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले. शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता. शिवसेना नेते, वरळी विधासभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला चालना मिळाली.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची म्हाडातर्फे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 121 जुन्या चाळींतील 9689 रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात उभारलेल्या 556 पुनर्वसन सदनिकांचा वितरण सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 16 रहिवाशांना ताबापत्र देण्यात आले.

बीडीडी चाळवासीयांना मिळालेली घरे ही पुढच्या पिढय़ांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक आहे. त्यामुळे कोणीही यातील घर विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.  या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री अॅड. आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, अपर मुख्य सचिव असीम गुप्ता उपस्थित होते.

मिंधे भाषणाला उभे राहताच आदित्य ठाकरेंच्या नावाच्या घोषणा

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळावी म्हणून शिवसेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. वरळीत वेळोवेळी पाहणी करून अधिकाऱयांशी चर्चा केली. आढावा घेतला. महत्त्वाच्या सूचनाही केल्या. बीडीडीवासीयांनी त्यांची ही तळमळ पाहिलेली असून त्याचाच प्रत्यय आज आला. या प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी महायुतीत आज चढाओढ लागली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी ‘महायुतीचाएएए काय म्हणायचं… अशी विचारणा उपस्थितांना केली. तेव्हा घडलं उलटंच. उपस्थितांमधून ’आदित्य साहेबांचा विजय असो’ अशा घोषणा घुमल्या. तेव्हा मिंधेंचा चेहरा पार उतरला होता.

पुनर्विकासासाठी जुन्या चाळी रिकाम्या करायला लावल्या तेव्हा सर्वात आधी आम्ही खोली रिकामी केली. त्यानंतर हळूहळू इतर लोक राहायला आली. घाबरू नका… तुम्हाला वेळेत नव्या घराचा ताबा मिळेल, असा विश्वास आदित्य ठाकरे आम्हाला वेळोवेळी द्यायचे. – कृष्णाबाई काळे, रहिवासी

Comments are closed.