वरळी कोस्टल मार्गावर भयानक अपघात; भरधाव कार रेलिंगला धडकून समुद्रात पडली

वरळी कोस्टल मार्गावर सोमवारी रात्री भयानक अपघात घडला. ताडदेव येथे राहणारा फ्रशोगर बत्तीवाला मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव अर्टिगा कार रस्त्याचे रेलिंग तोडून थेट समुद्रात जाऊन पडली. त्यावेळी सुदैवाने तेथे तैनात असलेले मसुब जवान पांडुरंग काळे व सुहास करसाडे यांच्या नजरेस ही बाब पडली. दोघांनी क्षणाचा विलंब न लावता स्वतःला समुद्रात झोकून दिले. समुद्राला भरती असल्याने फ्रशोगरला बाहेर काढणे मुश्कील होत होते. त्याच वेळी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पाटील व उपनिरीक्षक अतुल कुंभार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी मग पादचाऱ्यांच्या मदतीने बॅरेकेटिंगला लावलेली रस्सी काढून ती काळे व कराडे यांना दिली. त्या रस्सीच्या सहाय्याने फ्रशोगरला बाहेर काढण्यात यश आले. त्याची प्रकृत्ती आता ठीक असून रॅश ड्रायव्हिंग व ड्रंक ऍण्ड ड्राइव्हच्या कलमान्वये फ्रशोगरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.