Worli Hit and Run – आरोपीची बीएमडब्लू कार परत करण्यास न्यायालयाचा नकार, शाह कुटुंबीयांची याचिका फेटाळली
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीची बीएमडब्लू कार परत करण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. अपघातात वापरलेली कार परत केल्यास तिचा पुन्हा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत न्यायालयाने शाह कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
7 जुलै 2024 रोजी वरळी येथे आरोपी मिहिर शाह याच्या बीएमडब्लू कारने एका दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार थांबवून जखमी महिलेला रुग्णालयात नेण्याऐवजी कारने महिलेला काही अंतरावर फरफटत नेले होते. ही कार आरोपी मिहिर शाह चालवत होता.
वरकरणी पाहत या वाहनाचा शस्त्राप्रमाणे वापर करण्यात आला होता. याचा पुन्हा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल डी. साळुंके यांनी नोंदवले. आरोपी मिहिर शाह सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
Comments are closed.