MPL 2025: लयच चोपल बाबा! MPL 2023 च्या एकाच स्पेलमध्ये सर्वाधिक धावा लुटवणारे गोलंदाज

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा तिसरा हंगाम 4 जूनपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या दोन हंगामाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता तिसऱ्या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी आपण मागील दोन हंगामातील खेळाडूंच्या व संघाच्या कामगिरीचा मागोवा घेत आहोत. आज आपण एमपीएल 2023 मध्ये टाकल्या गेलेल्या सर्वात खराब गोलंदाजी स्पेलविषयी जाणून घेऊया.

एमपीएल 2023 मध्ये रत्नागिरी जेट्स संघाने विजेतेपद आपल्या नावे केले होते. संघाच्या यशात त्यांच्या आक्रमक फटकेबाजांचा मोठा वाटा होता. रत्नागिरीच्या याच फटकेबाजांमुळे ईगल नाशिक टायटन्सच्या युवा इझान सय्यद (Izhaan Sayyed) याच्या नावावर हंगामातील सर्वात खराब गोलंदाजी स्पेल नोंदवला गेला. इझानच्या गोलंदाजीवर रत्नागिरीच्या फलंदाजांनी 4 षटकात तब्बल 62 धावा कुटल्या. इझान आपल्या स्पेलमध्ये फक्त एकच बळी मिळू शकलेला.

पहिल्या हंगामातील खेळलेल्या सोलापूर रॉयल्स संघातील युवा गोलंदाज प्रथमेश गावडे (Prathamesh Gawade) हा देखील हंगामात 50 पेक्षा जास्त धावा लुटवण्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचे सलामीवीर केदार जाधव व अंकित बावणे यांनी त्याचा पहिला स्पेलमध्ये चांगलाच समाचार घेतला होता. त्याने आपल्या चार षटकात 54 धावा लुटवलेल्या. मात्र, अखेरच्या षटकात त्याने नौशाद शेख व तरणजीत यांना बाद करत काहीशी गोलंदाजी सुधारली.

ईगल नाशिक टायटन्स व पुणेरी बाप्पा या सामन्यादरम्यान अनेक अविस्मरणीय क्षण एमपीएल 2023 ला मिळाले होते. मात्र, नाशिकचा वेगवान गोलंदाज समाधान पगारे (Samadhan Pagare) याच्या गोलंदाजीवर पुण्याच्या फलंदाजांनी हल्ला चढवलेला. त्याच्या चार षटकात 52 धावा पुण्याच्या फलंदाजांनी चोपल्या. परंतु, अखेर त्याने पुण्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला बाद करत, आपल्या संघाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. नाशिक संघाने अवघ्या एका धावेने हा सामना जिंकला होता.

रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स या सामन्यात छत्रपती संभाजी किंग्सचा गोलंदाजा रामेश्वर दौड (Rameshwar Daud) याने पहिल्या दोन षटकात दोन बळी मिळवून चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्याच्या नंतरच्या स्पेलमध्ये त्याच्यावर फलंदाजांनी चांगलेच आक्रमण केले. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचे पृथक्करण 4 षटकात 50 धावा असे झाले. तो एमपीएल 2023 मध्ये 50 धावा देणारा चौथा गोलंदाज होता.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष व एमपीएलचे मुख्य आयोजक आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, एमपीएल 2025 देखील आधीच्या दोन हंगामाप्रमाणे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत पाहता येणार आहे. यासोबतच पहिल्यांदा WMPL देखील आयोजित केली जातेय. मावळ तालुक्यातील गहुंजे येथे असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धा JioHotstar व Star Sports 2 येथे थेट प्रक्षेपित होणार आहेत. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Comments are closed.