पुनरावृत्ती की बदला? आज अंतिम संघर्ष, दिल्ली कॅपिटल्सचे जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे ध्येय
अवघ्या हिंदुस्थानचे लक्ष लागलेय वुमन्स प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) फायनलकडे. मुंबई इंडियन्स आपले दुसरे जेतेपद जिंकणार की सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारणारी दिल्ली कॅपिटल्स आपल्या जेतेपदाचा दुष्काळ संपवणार, याची सर्वांना उत्सुकता लागलीय. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईचे सर्व अष्टपैलू खेळाडू फॉर्मात असल्यामुळे उद्याच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात आहे, तर दुसरीकडे दिल्लीचा संघ नियोजनबद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी करत असल्यामुळे उद्याच्या सामन्यात खऱ्या अर्थाने क्रिकेटचे द्वंद्व पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना लाभणार आहे.
डब्ल्यूपीएलच्या गेल्या दोन्ही मोसमांच्या अंतिम फेरीत एक गोष्ट समान होती. ती म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. 2023 च्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेटनी सहज पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले होते, तर दुसऱ्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सलाच 8 विकेटनी नमवले होते. दोन्ही सामने तीन चेंडू आधी संपले होते. आता तिसरा हंगाम असून पुन्हा एकदा पहिल्या हंगामाची फायनल खेळली जाणार आहे. मात्र त्याच सामन्याची पुनरावृत्ती होणार की डब्ल्यूपीएलला नवी विजेती लाभणार, हे उद्याच कळेल.
नॅट सिव्हर ब्रंट आणि हिली मॅथ्यूजच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सचे जेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त करत डब्ल्यूपीएल काबीज करण्याचे अंदाज क्रिकेटपंडितांनी आधीच वर्तवले आहेत. सिव्हर ब्रंटने 493 धावांसह 11 विकेट टिपल्या आहेत तर मॅथ्यूजनेही 17 विकेट आणि 304 धावा अशी अष्टपैलू कामगिरी करत मुंबईला अंतिम फेरी गाठून दिली आहे. या दोघींचा हाच झंझावात कायम राहिला तर दिल्ली कॅपिटल्सला जेतेपदापासून दूरच राहावे लागणार, हे कुणीही सांगू शकतो. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीला जेतेपदाची चव चाखायची असेल तर या दोघींचा काटा लवकर काढावा लागेल.
एलिमिनेटरमध्ये गुजरातचा धुव्वा
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने थेट धडक मारली होती, तर गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. एलिमिनेटरच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 213 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये हेली मॅथ्यूने 50 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने तुफानी 77 धावा चोपल्या, तर नॅटली सायव्हर-ब्रंट हिनेदेखील 41 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. मॅथ्यू आणि ब्रंट यांनी केलेल्या 135 धावांच्या भागीदारीच्या जोरावर आणि कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 12 चेंडूंत केलेल्या 36 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने 200 धावांचा टप्पा ओलांडला. 214 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 166 धावांतच गडगडला. मुंबईने 47 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.
तालिकेत दिल्ली अव्वल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मेग लॅनिंगने दिल्लीचा अंतिम फेरीत धडक मारून देताना कोणतीही कसर सोडलेली नाही. दिल्लीचा पुरुष संघ आजवर एकदाही आयपीएल जिंकलेला नाही, मात्र दिल्लीच्या महिलांना हे अपयश धुऊन काढायचे आहे. दिल्लीने गटात अव्वल स्थान पटकावत थेट अंतिम फेरी गाठली आहे तर मुंबईने एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सचा फडशा पाडत अंतिम फेरीत स्थान मिळवलेय.
मुंबईला घरच्या मैदानाचा लाभ
मुंबईने आपले पहिले जेतेपदही घरच्याच मैदानावर जिंकले होते आणि आताही ते घरच्याच मैदानावर दिल्लीविरुद्ध भिडणार आहेत. मुंबईला 2023 लाही घरच्या मैदानाने साथ दिली होती आणि आताही तोच करिश्मा अपेक्षित आहे. मुंबईची फलंदाजी खूप मजबूत आहे आणि दिल्लीच्या गोलंदाजांसाठी हेच आव्हान फार खडतर असेल.
दिल्लीची मदार गोलंदाजांवर
दिल्लीच्या संघात जेस जोनासन आणि शिखा पांडे असे फॉर्मात असलेले गोलंदाज आहेत. दोघींनीही 11-11 विकेट टिपत आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवलीय. जोनासनच्या फिरकीने साखळी सामन्यात मुंबईला 123 धावांवर रोखण्याचा पराक्रम केला होता. हा सामना दिल्लीने 9 विकेट आणि 33 चेंडू राखून जिंकला होता. मुंबईचे फलंदाज हे नक्कीच विसरलेले नसणार.
शेवटचे सामन्यातील संभाव्य युनियन
एन मुंबई इंडियन्स ः हरमनप्रीत कौर (कर्नाधर), हिली मॅथ्यूज, अमेलिया केर, नट शिवहर-बंट, अमंजत कौर, यस्तिका भाटिया, साजीवान सजना, जी. कमलिनी, संस्कृत गुप्ता, शबनम इस्माईल, सायक इशाक.
एन दिल्ली कॅपिटल्स ः मेग लॅनिंग (कर्नाधर), जेमिमा रॉड्रिग्ज, शफली वर्मा, अॅनाबेल सड्रालँड, जेस जोनासेन, मारियाझन कॅप, सारा ब्रायस (यश्तकर), निक्की प्रसाद, टायटास साधू, शिखा पंडे, मिनु मनी.
Comments are closed.