वन डे वर्ल्डकपच्या तयारीत WPL महत्त्वाची भूमिका बजावेल, हरमनप्रीत कौरनं व्यक्त केला विश्वास
वन डे वर्ल्डकपच्या तयारीत WPL महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास हिंदुस्थानच्या महिला संघाची कर्णधार आणि वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणारी हरमनप्रीत कौर हिने व्यक्त केला आहे. हरमनच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात चषक उंचावला होता, मात्र दुसऱ्या हंगामात मुंबईला फायनल गाठता आली नव्हती. आता 2025 मध्ये होणाऱ्या हंगामात पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज आहे.
मुंबई आयोजित एका कार्यक्रमात बोलताना हरमनप्रीत कौर हिने अनेक आठवणी सांगितल्या. मुंबईमध्ये वेळेला खुप महत्त्व आहे, असेही ती म्हणाली. यंदाच्या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्डकपच्या तयारीत डब्ल्यूपीएल महत्त्वाची भूमिका बजावेल असे म्हटले. तसेच अंडर-19 संघाने सलग ट्रॉफी जिंकली असून हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे, असेही ती म्हणाली.
मुंबईची गोलंदाजी प्रशिक्षक आणि टीम मेंटॉर झुलन गोस्वामी हिने संघातील खेळाडूंचे कौतुक केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ करणाऱ्या जी कमालिनी, संस्कृती गुप्ता सारख्या खेळाडूही आमच्या संघात आहेत. यामुळे संघ संतुलित झाला आहे, असे झुलन म्हणाली.
दुसरीकडे मुंबईची मुख्य कोच चार्लोट एडवर्डस हिने वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकर हिच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती दिली. पूजा जायबंदी असून तिच्यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. ती संघातील महत्त्वाची खेळाडू असून गेल्या हंगामात तिने दमदार कामगिरी केली होती चार्लोट एडवर्डसनी म्हटले.
दरम्यान, वुमन्स प्रीमियर लीगचा तिसरा सीझन 14 फेब्रुवारी 2025 रोजी वडोदरा येथे सुरू होईल. मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना 15 फेब्रुवारी रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे.
Comments are closed.