आरसीबीची विजयाची हॅट्ट्रिक, WPL इतिहासात पहिल्यांदाच असा पराक्रम; टॉप-3 मध्ये या संघांचा समावेश

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) संघाने WPL 2026 मध्ये दणदणीत सुरुवात करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. शुक्रवार, 16 जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या 9व्या सामन्यात आरसीबीने गुजरात जायंट्सचा 32 धावांनी पराभव करत सलग तिसरा विजय (हॅट्ट्रिक) नोंदवला. या विजयासह आरसीबीने WPL पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे.

WPL 2026 मध्ये सहभागी असलेल्या पाच संघांपैकी आरसीबी हा एकमेव संघ आहे, ज्याने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. विशेष बाब म्हणजे डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्ससारखा बलाढ्य संघ आतापर्यंत 4 पैकी 2 सामने हरला आहे. WPL च्या इतिहासात प्रथमच आरसीबीने सलग तीन विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली आहे.

या हंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा पराभव केला, त्यानंतर यूपी वॉरियर्सविरुद्ध विजय मिळवला आणि आता गुजरात जायंट्सवर मात करत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. आरसीबीचा पुढील सामना आज, 17 जानेवारी रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकण्यात यश आल्यास आरसीबी स्पर्धेतील सर्व संघांना पराभूत करत विजयाचा चौकार पूर्ण करेल.

WPL 2026 पॉइंट्स टेबल पाहता, आरसीबी 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांचा +1.828 नेट रन रेट इतर सर्व संघांपेक्षा सर्वोत्तम आहे. टॉप-3 मध्ये आरसीबीसोबत मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांचा समावेश आहे. WPL च्या नियमानुसार टॉप-3 संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळतो. पहिल्या क्रमांकाचा संघ थेट फायनलमध्ये पोहोचतो, तर दुसरा आणि तिसरा संघ एलिमिनेटर सामना खेळतात.

Comments are closed.