IND vs NZ: आयपीएलमध्ये 'अनसोल्ड' राहिलेल्या मिचेलचा भारतीय गोलंदाजांना दणका! सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं शतक

गेल्या महिन्यात दुबईत झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरलेल्या डॅरेल मिचेलने (Daryl Mitchell) भारताविरुद्धच्या मालिकेत वचपा काढला. ऑक्शनमध्ये दहापैकी एकाही संघाने स्वारस्य न दाखवलेल्या मिचेलने आपली ताकद भारतात येऊन दाखवली. इंदोर वनडेत मिचेलने सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. मिचेलच्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने भारतासमोर 338 धावांचं लक्ष्य दिलं आहे.

3 सामन्यांच्या मालिकेत, मिचेलने दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं. बडोद्यात मिचेलने 84 धावा केल्या. राजकोटमध्ये मिचेलच्या नाबाद 131 धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने 300 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला. आज इंदोरमध्ये सुरू असलेल्या लढतीत मिचेलने 137 धावांची मॅरेथॉन खेळी केली.

16 डिसेंबर रोजी दुबईत झालेल्या आयपीएल ऑक्शनवेळी मिचेलची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती. मोठी खेळी करू शकण्याची क्षमता, फटकेबाजीची ताकद, उपयुक्त मध्यमगती गोलंदाज आणि अफलातून क्षेत्ररक्षक ही ओळख असूनही मिचेलला ताफ्यात घेण्यात कुठल्याच संघाने स्वारस्य दाखवलं नाही. अनेक माजी खेळाडूंनी मिचेलला न घेण्यावरून आश्चर्य व्यक्त केलं होतं.

2022 मध्ये मिचेल राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता. 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने तब्बल 14 कोटी रुपये खर्चून मिचेलला संघात घेतलं. 13 सामन्यात त्याने 162.60 च्या स्ट्राईकरेटने 318 धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. मिचेलची कामगिरी वाईट नव्हती मात्र चेन्नईची कामगिरी यथातथाच राहिली. बेन स्टोक्सऐवजी (Ben Stocks) चेन्नईने मिचेलचा विचार केला. मात्र स्टोक्स विशेष गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी करतो. मिचेल गोलंदाजीत तसं योगदान देऊ शकला नाही. त्यामुळे पुढच्या हंगामात चेन्नईने त्याला रिटेन केलं नाही.

भारताविरुद्ध वनडेत मिचेलने 13 सामन्यात 74 च्या सरासरीने 741 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समाविष्ट आहेत. 2023 मध्ये मिचेलने धरमशाला इथे 130 धावांची खेळी केली होती. काही दिवसांनंतर वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये मिचेलने 134 धावांची खेळी साकारली होती.

34 वर्षीय मिचेल हा न्यूझीलंडच्या फलंदाजीचा आधारस्तंभ आहे. कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही प्रकारात खेळतो. फिरकीविरुद्ध खेळण्यासाठी आवश्यक तंत्र त्याच्याकडे आहे. 35 कसोटी, 58 वनडे आणि 90 टी20 सामन्यात त्याने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.

Comments are closed.