साहित्याच्या मांडवात नेत्यांचे संमेलन

साहित्य संमेलनात राजकारण्यांची गर्दी नको, अशी भूमिका आजवर अनेक साहित्यिकांनी मांडली आहे. मात्र प्रत्यक्षात साहित्य संमेलने राजकारणापासून वेगळी ठेवता आलेली नाहीत. यंदा दिल्लीत होणारे 98 वे साहित्य संमेलन याला अपवाद नाही. दिल्ली संमेलन सत्ताधाऱयांनी हायजॅक केल्याचे दिसत आहे. साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीत राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम सुरू आहेत. नेत्यांच्या या संमेलनावर साहित्य विश्वातून नाराजी व्यक्त होत आहे.

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी या काळात होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱया संमेलनाला विशेष महत्त्व आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. या दोघांसोबतच उद्घाटनीय सत्राच्या मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय तीन दिवसीय संमेलनाच्या विविध सत्रांत अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाच्या दिल्ली कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर मंगळवारी शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. बुधवारी खासदार मुरलीधर मोहोळ आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीतील सन्माननीय मराठी जनांचा सन्मान सोहळा झाला.

वादविवाद महाराष्ट्राच्या निकोप वाढीसाठी चांगला – संजय नहार

मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास नीट वाचला तर यापेक्षाही गंभीर टीका साहित्य संमेलनावर झाली आहे. गोविंद तळवळकर यांनी भिक्षुकांचे संमेलन म्हटले होते. दुर्गाबाईंनी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना संमेलनाला येऊ दिले नव्हते. वादविवाद हे महाराष्ट्राच्या निकोप वाढीसाठी चांगले आहेत, असे सरहदचे संस्थापक आणि साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार म्हणाले. वादविवादाने काही फरक पडत नाही. अशा प्रकारची टीका करण्याची परंपरा आहे. त्यामुळे संमेलन खऱया अर्थाने महाराष्ट्राचे असल्याचे सिद्ध होते. संजय राऊत हे आमचे चांगले मित्र आहेत. नुसतेच मित्र नाही, तर त्यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावना मी दिली आहे. व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल आमच्या मनात टोकाचा आदर आहे. त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे संजय नहार म्हणाले.

महामंडळाची अपरिहार्यता – श्रीपाद जोशी

संमेलनांच्या व्यासपीठाचा राजकारणासाठी वापर ही संस्कृती काही नवीन नाही, ते गैर आहे असेही आता कोणाला वाटेनासे झाले आहे. सरकार, म्हणजे सत्तारूढ राजकीय पक्ष तर विश्व मराठी संमेलनासारखी संमेलने स्वतःच, त्यांचे ते काम नसतानाही आयोजित करू लागले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होणे शक्य नाही हे स्पष्टच झाले आहे. तेव्हा हे संमेलन कोटय़वधींचा खर्च उभारण्यासाठी अधिकाधिक सरकाराश्रयी, राजकारण्यांच्या आश्रयाने, सत्ताश्रयी, धनिकाश्रयी होत राहणे यापुढे अपरिहार्य होत जाणार आहे, असे साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी म्हणाले. हे संमेलन महामंडळाने स्वतः कमीत कमी खर्चात आयोजित करण्याची तयारी दाखवल्याशिवाय व मराठी भाषिक समाजाने ते तसेच व्हावे हे मान्य केल्याशिवाय या पुढे ते महामंडळाच्या नियंत्रणात कधीच राहू शकणार नाही. छोटी, आदर्श, कमी खर्चाची संमेलने करून दाखवण्याची मानसिकता स्वीकारण्याची तयारी आता ना सरकारची आहे, ना महामंडळाची, अशी टीका श्रीपाद जोशी यांनी केली.

संमेलन हायजॅक करू नये

साहित्यिक व्यासपीठावर राजकारण्यांचा विटाळ मानू नये, पण त्याचबरोबर संमेलने राजकारण्यांनी हायजॅक करू नये. राजकारणांच्या दोषावर साहित्यिकांनी कोरडे ओढले पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत. सांस्कृतिक लोकशाहीला जिवंत ठेवण्याचे काम केले पाहिजे. – डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष

संमेलन महामंडळाने स्वतः कमीत कमी खर्चात आयोजित करण्याची तयारी दाखवल्याशिवाय व मराठी भाषिक समाजाने ते तसेच व्हावे हे मान्य केल्याशिवाय संमेलन महामंडळाच्या नियंत्रणात राहू शकणार नाही. – श्रीपाद जोशी

Comments are closed.