क्रिकेटनामा – आमचा आत्मविश्वास शिखरावर!

>> संजय खडे

नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धेच्या पास्ता-पिझ्झ्यानंतर पुन्हा एकदा समग्र, मनसोक्त अशा कसोटी मेजवानीचे दिवस सुरू होत आहेत. विंडीजविरुद्ध हिंदुस्थानी संघ दोन कसोटी सामने, पहिला आजपासून अहमदाबादला आणि दुसरा 10 तारखेपासून दिल्लीत खेळणार आहे. 2018 नंतर प्रथमच त्यांचा संघ आपल्याकडे कसोटी दौरा करत आहे. सात वर्षांपूर्वी कसोटी मालिकेत 2-0, वन डे मालिकेत 3-1 तर टी–ट्वेंटी मालिकेत 3-0 असा दारुण पराभव पदरी घेऊन ते परतले होते. आताही दौरा करताहेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 अशा पराभवाचा घोट गिळून. शेवटच्या कसोटीत तर त्यांचा डाव संपला होता नाममात्र 27 धावांवर! याउलट हिंदुस्थानच्या संघाचा आत्मविश्वास हिमालयाच्या शिखरावर आहे! इंग्लंडविरुद्ध पाच कसोटींच्या मालिकेत 2-2 च्या बरोबरीनंतर आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला लागोपाठ तीन वेळा हरविण्याचा पराक्रम त्यांच्या खिशात आहे. टी-ट्वेंटी आणि कसोटी संघात थोडाफार फरक असेल, पण एक हिंदुस्थानी म्हणून सर्वांचीच मान ताठ आहे.

देवदत्त पडिक्कलने करुणची जागा घेतली आहे आणि पंतची जागा ध्रुव जुरेलने. हल्लीच मी ईशांत शर्माची मुलाखत पाहिली. तो म्हणतो, ‘जे खेळाडू वगळले जातात तेच निवडल्या गेलेल्यांपेक्षा सरस असतात अशी भूमिका घेणं योग्य नाही…’ ईशांतचं म्हणणं मान्य. पण ऋषभ कामगिरीमुळे नाही तर स्वतःच्या चुकीमुळे बाहेर राहिलेला आहे. मँचेस्टर कसोटीत वोक्सला उलटा स्वीप मारण्याच्या नादात त्याने आपला पाय जखमी करून घेतला. मी नेहमीच म्हणतो, कसोटी क्रिकेटमध्ये सरळ बॅटची शपथ घ्यावी लागते. ती महत्त्वाची असते, आहे अन् राहील. अन्यथा केवढी किंमत मोजावी लागते हे ऋषभच्या आज ध्यानात आलं असेल. इंग्लंड दौऱ्यावर पाचवी कसोटी खेळू शकला नाही, आशियाई स्पर्धेला मुकला आणि फेब्रुवारीत होणाऱ्या वर्ल्ड कपची शाश्वती नाही! हा धडा ऋषभसाठीच नव्हे तर इतरांसाठीसुद्धा आहे!

विंडीजने आपल्या फिरकीला जवाब देण्यासाठी अलिक अथनाझ आणि तेजनारायण चंदरपॉलचा संघात समावेश केलाय. शाई होपसुद्धा आहे. शिवाय कप्तान चेस, उपकप्तान वॉरिकन आणि डावरा पिअर आपल्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर त्यांची किंमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील.

न्यूझीलंडने आपल्याच घरी दिलेला 3-0 चा आहेर आपल्या लक्षात असेलच. आज संघात विराट, रोहित आणि अश्विन नाहीत पण शुभमन, राहुल, जयस्वाल, साई, पडिक्कल, जुरेल अशी नवी दमदार पिढी आहे. आणि विंडीज फलंदाजांना नामोहरम करण्यासाठी विश्रांतीवीर बुमरा, सिराज, प्रसिध, जडेजा, अक्षर, सुंदर आणि कुलदीप आहेत. त्यांच्यासमोर विंडीजचा संघ फार मोठं वादळ निर्माण करेल असं वाटत नाही.

हे दोन कसोटी सामने जिंकून जागतिक कसोटी स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण अंक मिळवून आपण मुसंडी मारू अशी अपेक्षा आहे.
अर्थात, हे सगळं शक्य होईल-जर अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला तर!

Comments are closed.