क्रिकेटनामा – प्रयोगशाळेचा विजय असो!

>>संजय कऱ्हाडे

हरणं-जिंकणं नाही, सहभागी होणं महत्त्वाचं, असं ऑलिम्पिकचा जनक ऍलन कुबर्टीन म्हणत असे. आज हा विचार हास्यास्पद ठरतो. आयोजकांसाठी, खेळाडूंसाठी, चाहत्यांसाठी अन् प्रायोजकांसाठी! जिंका, प्रायोजक मिळावा. अधिक जिंका, अधिक पैसे कमवा! साहजिकच, सगळ्यांचा प्रयत्न जिंकण्याचा!

क्रिकेटच्या बाबतीत मात्र थोडं वेगळं असतं. आपल्या देशात क्रिकेटचा खेळ इतका लोकप्रिय आहे की, जिंकलं-हरलं फरक पडत नाही. कुणी कुणाला जाब विचारत नाही आणि कुणी कुणाला हातून घडलेल्या प्रमादासाठी अंगठे धरायची शिक्षा देत नाही! प्रायोजक रांग लावून तयार असतात. त्याचमुळे, परिणामाची चिंता न करता आगरकर-गंभीर जोडी हवी तशी मनमानी करू शकते. अनेक खेळाडूंच्या कामगिरीतलं सातत्य, फलंदाजांची क्रमवारी, पर्यायाने त्यांचा आत्मविश्वास सगळं हरपलं. कमिन्स, हेझलवूड, स्टार्क, ट्रव्हिस हेडच्या अनुपस्थितीत आगौच्या प्रयोगशाळेचा विजय असो!

आगौने अधिकार हाती पडल्यापासून प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं. रो-कोपासून सुरुवात झाली. मात्र, रो-कोच्या कामगिरीमुळे त्यांची मनमानी उघडी पडली. त्यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे स्पष्ट जाणवूनही गेली. त्याचा परिणाम?

काही उदाहरणंच पाहू. साधी स्प्रिंग वॉटरची बाटलीसुद्धा सॅमसन ओपन करू शकत नाही! कुलदीपने ‘कुणी मला संघात घेता का’ असा हाकारा आगौच्या हॉटेल रूमच्या आसपास केल्याच्या अफवा मी ऐकल्या! कसोटी खेळल्यानंतर बाकीच्या वेळात चाट-तज्ञ म्हणून काम करण्यासाठी यशस्वीने कुणाल विजयकरची भेट घेतल्याचं कानावर आलंय! वॉशिंग्टनला त्याच्या आईनेसुद्धा इडली-सांबार एकत्र देण्यास नकार दिलाय! बॅटिंग कर किंवा बोलिंग – इडली खा किंवा सांबार गीळ! अर्शदिपची तर मोठीच पंचाईत होऊन बसली आहे. तुम्हीच सांगा, आता या सरदाराने हातपाय न उचलता आणि फुर्रर्र असं न बोंबलता भांगडा तरी कसा करावा! प्रयोगशाळा तशीच कर्मठ आहे…

आणखीही काही आहेत. त्याचं कसब, कौशल्य आगौच्या कानावर गेलं आहे. पण ते पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचे आडाखे तयार नाहीत. म्हणून त्यांची करारपत्रं अजून तयार व्हायची आहेत. ही मंडळी आपापल्या बाबांचा शर्ट ओढत हातपाय आपटतायत!

शुभमन कधी-कधी नव्हे तर सर्वप्रथम टी-ट्वेंटीचा फलंदाज आहे, सूर्या अनंत काळचा कप्तान आहे, राणाजी शिरसावंद्य आहेत अशा ठाम मनःस्थितीत आगौ अंतरज्ञानाने पोहचलेले आहेत. अभिषेकमध्ये त्यांना साक्षात रिचर्ड्स दिसतोय. अन् तिलकने तिसऱ्या क्रमांकावर सामना जिंकणाऱ्या खेळी केल्या नेमकं तेव्हाच आगौला शिंका आल्या. त्यामुळे त्याचाही नाइलाज झालाय! शुभमन तिसऱ्या क्रमांकावर खेळत नाही. आगौ म्हणतात, तिसऱ्या क्रमांकावर खेळायला गेलं की क्रिझवरील मुंग्या त्याला चावतात!

आता आज शेवटच्या सामन्यात कोण कोणाला चावतंय तेच पाहू!

Comments are closed.