मिचेल स्टार्क WTC मध्ये इतिहास रचू शकतो, आपल्याच संघातील दोन खेळाडूंना मागे टाकून नंबर-1 बनण्याची सुवर्णसंधी

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 2025-26 च्या ऍशेस मालिकेत मिचेल स्टार्कची कामगिरी आतापर्यंत खूपच प्रभावी ठरली आहे. तीन कसोटी सामन्यांमध्ये 22 बळी घेणाऱ्या स्टार्कने 17.04 च्या प्रभावी सरासरीने विरोधी फलंदाजांना सतत अडचणीत आणले आहे आणि सध्या तो मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

या दमदार फॉर्ममध्ये मिचेल स्टार्कला आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे. डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम सध्या नॅथन लायनच्या नावावर असून त्याच्या खात्यात 224 विकेट जमा आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स 221 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

स्टार्कने सध्या डब्ल्यूटीसीमध्ये 52 सामन्यांत 213 विकेट्स घेतल्या असून त्याला अव्वल स्थानावर येण्यासाठी केवळ 11 विकेट्सची गरज आहे. विशेष बाब म्हणजे ऍशेस मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी लियॉन आणि कमिन्स हे दोघेही उपलब्ध नसल्यामुळे स्टार्कचा मार्ग आणखी सुकर झाला आहे.

26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत हा विक्रम आपल्या नावावर करण्याची स्टार्कला मोठी संधी आहे. हे यश इथे साधले नाही तर सिडनी कसोटीतही इतिहास रचण्याची आणखी एक संधी त्याला मिळेल. सध्याचा वेग आणि आत्मविश्वास पाहता स्टार्कला ही कामगिरी करणे पूर्णपणे शक्य आहे.

इंग्लंडविरुद्ध मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ब्रेंडन डॉगेट, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, ऱ्हाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, जेक वेदरल्ड, ब्यू वेबस्टर.

मेलबर्न कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन: झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ (wk), विल जॅक, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग.

Comments are closed.