टीम इंडियाला आणखी एक धक्का; WTC च्या पॉइंट टेबलमध्ये पुन्हा उलथापालथ, टॉप-5 मधून भारत बाहेर

NZ ने WI दुसऱ्या कसोटीवर मात केल्यानंतर WTC गुण सारणी : टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूजीलंड संघाने वेस्ट इंडिजचा दुसऱ्या कसोटीत 9 विकेटने धुव्वा उडवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या दमदार विजयामुळे केवळ मालिकेतच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) पॉइंट्स टेबलवरही कीवी संघाने मोठी झेप घेतली आहे. न्यूजीलंड थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

टीम इंडियाला मोठा धक्का!

कीवींच्या या विजयाचा भारतावर मात्र मोठा फटका बसला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आता टॉप-5 मधूनही बाहेर घसरली आहे. नुकताच भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 ने पराभवाचा सामना करावा लागला होता, त्याचा परिणाम थेट पॉइंट्स टेबलवर दिसत आहे.

भारताचा पुन्हा एकदा WTC फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण दिसत आहे. आतापर्यंत भारताने तीन मालिका इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका खेळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली, वेस्ट इंडिजला भारताने 2-0 ने पराभूत केले, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 ने पराभव पत्करावा लागला. भारताच्या उरलेल्या तीन मालिका न्यूजीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. यामध्ये भारत फक्त ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे.

न्यूजीलंड थेट तिसऱ्या स्थानावर झेप

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरी कसोटी जिंकल्यानंतर न्यूजीलंडच्या खात्यात 66.67 टक्के गुण झाले आहेत. त्यांच्यापुढे फक्त मागील WTC चे दोन्ही फायनलिस्ट ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हेच संघ आहेत. ऑस्ट्रेलिया 100 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 75 टक्के गुण आहेत.

टीम इंडियाकडे पाहिल्यास भारताने 9 सामन्यांत 4 विजय, 4 पराभव आणि 1 सामना ड्रॉ असा प्रवास केला असून केवळ 48.15 टक्के गुण मिळवले आहेत. त्यामुळे भारत WTC पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तान 50 टक्के गुणांसह भारतापेक्षा एक पायरी वर, म्हणजे पाचव्या स्थानी आहे.

तिसऱ्या दिवशी न्यूजीलंडने वेस्ट इंडिजचा फडशा पाडला

वेलिंग्टन कसोटीत न्यूजीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेटने पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिली कसोटी सामना ड्रॉ झाला होता. मात्र दुसरी कसोटी अवघ्या तीन दिवसांत निर्णायक ठरली. तिसऱ्या दिवशी जेकब डफीच्या भेदक आणि धारदार गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव फक्त 124 धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूजीलंडसमोर विजयासाठी फक्त 52 धावांचे सोपे लक्ष्य होते, जे त्यांनी केवळ एकच विकेट गमावून सहज पार केले.

हे ही वाचा –

IND vs SA 2nd T20 : तिलक वर्मा एकटा पडला, बाकी आले अन् गेले…, 6 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव, गौतम गंभीरचा किती हात?

आणखी वाचा

Comments are closed.