भारताच्या दबावाखाली X' माघार.

आता ‘ग्रोक-एआय’ अश्लील फोटो तयार करणार नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ने त्यांच्या नवीन ‘ग्रोक-एआय’ फीचरचा गैरवापर रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ‘ग्रोक’च्या माध्यमातून आता अश्लील मजकूर आणि अश्लील प्रतिमा तयार करता येणार नाहीत. भारत आणि ब्रिटनसह अनेक देशांनी या फीचरबद्दल ‘एक्स’कडे तक्रार करत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. अनेक देशांनी ‘ग्रोक’वर बंदी घालण्याची धमकी दिल्यानंतर, अखेर ‘एक्स’कडून माघारीचा निर्णय घेण्यात आला. ही कारवाई करतानाच ‘एक्स’ने साडेतीन हजारहून अधिक अश्लील मजकूर काढून टाकले आहेत. तसेच जवळपास 600 हून अधिक अकाऊंट रद्द केली आहेत.

जानेवारी महिन्याच्या प्रारंभी केंद्र सरकारने अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ला नोटीस पाठवत ‘ग्रोक-एआय’मधून अश्लील सामग्री काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. यासंबंधी सरकारने कंपनीला 72 तासांत अहवाल सादर करण्यासही बजावले होते. 2 जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशात ‘एक्स’च्या ‘ग्रोक-एआय’ तंत्रज्ञान वापरून तयार केलेली सामग्री त्वरित काढून टाकावी, असे निर्देश दिले. सदर निर्देशांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’च्या जनरेटिव्ह एआय चॅटबॉट, ग्रोकचा गैरवापर वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र सरकारने कडक पवित्रा घेतला होता. वापरकर्ते सदर संदर्भांचा वापर अश्लील सामग्री तयार करण्यासाठी करत होते. या वाढत्या ट्रेंडमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली होती. त्यामुळेच भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (आयटी मंत्रालय) कठोर कारवाई करत ‘एक्स’ला त्यांच्या ‘ग्रोक-एआय’ तंत्रज्ञानाचा तात्काळ आढावा घेण्याचे आदेश दिले होते.

 

Comments are closed.