मोठी बातमी: भारतीय स्टार सलामीवीरची तब्यत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

एका बाजूला क्रिकेटप्रेमी आयपीएल ऑक्शनच्या घडामोडींमध्ये गुंतलेले असताना, दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुपर लीग सामन्यानंतर जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर काही तासांतच जयस्वालला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. इंडियन एक्सप्रेसमधील एका वरिष्ठ पत्रकाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीनुसार, सामना सुरू असतानाच जयस्वाल पोटात कळा येत असल्यामुळे अस्वस्थ होता. मात्र सामना संपल्यानंतर वेदना अधिक वाढल्याने त्याला वैद्यकीय मदत घ्यावी लागली.

यानंतर जयस्वालला पिंपरी-चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला ‘अक्यूट गॅस्ट्रोएन्टेरायटिस’ झाल्याचे स्पष्ट केले. 23 वर्षीय या युवा फलंदाजावर ड्रिपद्वारे उपचार करण्यात आले असून अल्ट्रासाऊंड (USG) आणि सीटी स्कॅनसारख्या तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत. सध्या त्याला औषधे सुरू ठेवण्याचा आणि पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, प्रकृती ठीक नसतानाही जयस्वालने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 16 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या. या सामन्यात मुंबईने तीन विकेट्स राखून विजय मिळवला. कर्णधार अजिंक्य रहाणेने नाबाद 72 धावांची संयमी खेळी केली, तर सरफराज खानने केवळ 22 चेंडूंमध्ये 73 धावांची तडाखेबंद खेळी करत सामन्याचे चित्र पालटले. मात्र, या विजयाचा फारसा फायदा झाला नाही आणि मुंबईचा संघ पुढे स्पर्धेतून बाहेर पडला.

दरम्यान, सामना सुरू असतानाच जयस्वाल अस्वस्थ दिसत असल्याचेही पाहायला मिळाले. सामन्यानंतर वेदना वाढल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या बीसीसीआयकडून जयस्वालच्या तब्येतीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नसले तरी लवकरच अपडेट मिळण्याची शक्यता आहे.

जयस्वालच्या अलीकडील कामगिरीकडे पाहिले तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने तीन सामन्यांत 48.33 च्या सरासरीने आणि 168.6 च्या स्ट्राइक रेटने 145 धावा केल्या आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलीकडील वनडे मालिकेतही त्याने तीन सामन्यांत 78 च्या सरासरीने 156 धावा करत आपले पहिले वनडे शतक झळकावले होते.

Comments are closed.