यशस्वीला मुंबईकडूनच खेळायचेय! दोन आठवडय़ांतच गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला मागे

अजिंक्य रहाणेबरोबर झालेल्या कथित वादानंतर हिंदुस्थानचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैसवालने तडकाफडकी मुंबई क्रिकेटला सोडचिठ्ठी देत गोव्याकडून खेळणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचा हा निर्णय अनेकांना खटकला होता. मात्र खुद्द यशस्वीनेही दोन आठवडय़ांतच आपला निर्णय मागे घेत असल्याची माहिती देत पुन्हा मुंबईकडूनच खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्याने मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) ई-मेलही पाठवला आहे. मात्र एमसीएने याबाबत आपली कोणतीही भूमिका तूर्तास मांडलेली नाही.

या मेलमध्ये यशस्वीने एमसीएकडे गोव्याकडून खेळण्यासाठी देण्यात येणारे ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यात यावे, अशी विनंती केली आहे. यशस्वी आगामी हंगामात मुंबईकडून खेळण्यासाठी तयार असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात केला आहे.

या वृत्तात जैसवाल म्हणाला की, माझ्या पुटुंबाचा गोवेकर होण्याचा कोणताही विचार नाही. त्यामुळे आपण मला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यात यावं, अशी मी विनंती करतो. मला या हंगामात मुंबईकडून खेळायचे आहे. मी गोवा क्रिकेट संघटना किंवा बीसीसीआयला ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही, असेही यशस्वीने केलेल्या मेलमध्ये नमूद केले आहे, मात्र यशस्वीने केलेल्या ई-मेलवर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

यशस्वी गेली अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र यशस्वीने मध्यंतरी गोव्याकडून खेळण्याचं ठरवलं होत. त्यामुळे यशस्वीने एमसीएकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. नियमांनुसार, एखाद्या खेळाडूला इच्छुक संघाकडून खेळायचं असेल तर त्याला सध्याच्या टीमकडून देण्यात येणार ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागतं. त्यासाठीच यशस्वीने एमसीएकडे अर्ज केला होता, मात्र आता यशस्वीने तो निर्णय बदलला आहे. यशस्वी गोव्याकडून खेळण्यासाठी इच्छुक असल्याचं वृत्त एप्रिल महिन्यात समोर आलं होतं. यशस्वीने तेव्हा गोव्याकडून खेळणार असल्याचं एमसीएला कळवलं होतं. यशस्वीने तेव्हा गोव्याकडून खेळण्याच्या निर्णयामागे कौटुंबिक कारणाचा दाखला दिला होता.

गोवा बोर्डाकडून मला कर्णधारपदाची ऑफर आली. देशासाठी चांगली कामगिरी करणं हे माझं प्रथम प्राधान्य आहे. गोवा टीमला देशांतर्गत स्पर्धेत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन. मला गोव्याकडून ही संधी मिळाली. त्यामुळे मी ही संधी स्वीकारली, अशी भावना यशस्वीने व्यक्त केली होती.

रहाणेशी वादच होते मूळ

यशस्वी एका सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला डिवचत होता. त्यामुळे रहाणेने यशस्वीवरील संभाव्य कारवाई लक्षात घेत त्याला वाचवण्यासाठी मैदानाबाहेर पाठवलं होतं. त्यामुळे या रागातून यशस्वीने रहाणेच्या क्रिकेट कीटला लाथ मारली होती आणि पुढे याच रागाच्या भरात त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता काही दिवसांतच यशस्वीने निर्णय बदलला आहे. याप्रकरणी अजिंक्य रहाणे आणि यशस्वी यांच्यात दिलजमाई झाल्याचेही बोलले जात आहे.

Comments are closed.