Yavatmal News – घरात झोपलेल्या 11 वर्षीय मुलाच्या सर्पदंश; उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे घरात झोपलेल्या 11 वर्षीय मुलाच्या कानाला सर्पदंश झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आर्यन चंद्रकांत तुम्मावार असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास आर्यन घरात झोपलेला असताना त्याच्या कानाला सर्पदंश झाला. सुरुवातीला एखादा किडा चावला असावा, असे कुटुंबीयांना वाटल्याने सर्पदंश झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. दरम्यान, काही वेळातच आर्यनची प्रकृती खालावू लागली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच आर्यनची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे माणूसधरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात घरात तसेच परिसरात सापांपासून विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.