Yavatmal News – बाबाजी दाते महिला सहकारी बँक प्रकरणाचा तपास; ईडीची धाड, अशोक कंचलवार यांच्या घरी झडती

वणी शहरातील जैन स्थानकामागील निळकंठ मालती अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सकाळी प्रवर्तन संचालनालयाच्या (ईडी) पथकाने धाड टाकल्याने शहरात खळबळ उडाली. सकाळी सुमारे ६ वाजतापासून सुरू झालेली ही कारवाई बराच वेळ सुरू होती. याच परिसरातील रवींद्र येरणे यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने झडती घेत चौकशी केली. येरणे यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरू असतानाच आता ईडीकडूनही तपास सुरू झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

दरम्यान, यवतमाळ शहरात अशोक कंचलवार यांच्या निवासस्थानीही ईडीच्या पथकाने धाड टाकल्याची माहिती आहे. कंचलवार हे बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी झालेली ईडीची कारवाई तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

कर्जदार, मूल्यांकनकारांपर्यंत तपासाची व्याप्ती

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेच्या तपासात ईडीने बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच कर्जदार, मूल्यांकनकार (व्हॅल्यूअर) आणि लेखापरीक्षकांच्या भूमिकेचाही तपास सुरू केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कर्ज मंजुरी व वितरणातील कथित अनियमितता, पुरेशा तारणाशिवाय कर्जवाटप आणि कर्जाच्या रकमेच्या कथित वळवणुकीशी संबंधित आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.

यामुळे गुरुवारी झालेल्या कारवाईत बँकेशी प्रत्यक्ष किंवा आर्थिक व्यवहारांद्वारे संबंधित असलेल्या विविध व्यक्तींच्या ठिकाणांचा समावेश असल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात नऊ ठिकाणी एकाचवेळी कारवाई

ईडीने यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे नऊ ठिकाणी एकाचवेळी झडती घेतल्याचे अधिकृत वृत्त आहे. ही कारवाई धनशोधन प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरणाच्या तपासाचा भाग आहे. यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिस ठाण्यात बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कर्जदारांविरुद्ध दाखल विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.

बँकेच्या कर्जवाटपातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत तपास केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे २४२ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे.

आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडीचीही चौकशी

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेशी संबंधित प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून यापूर्वीच चौकशी सुरू होती. आता ईडीने धनशोधनाच्या अंगाने तपास सुरू केल्याने बँकेशी संबंधित अधिकारी, कर्जदार, मूल्यांकनकार आणि अन्य संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, वणीतील रवींद्र येरणे आणि यवतमाळातील अशोक कंचलवार यांच्या निवासस्थानी झालेल्या कारवाईत नेमकी कोणती कागदपत्रे किंवा आर्थिक व्यवहार तपासण्यात आले, तसेच ईडीच्या हाती काय लागले, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही. त्यामुळे पुढील कारवाईनंतरच या धाडीचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.