Yavatmal News – खडकीत प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्याची लागवड; शेतकरी संघटनेचा सविनय कायदेभंग
केंद्र शासनाने यंदाही एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्याच्या लागवडीला परवानगी दिली नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित बियाणे उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत १७ जून रोजी राळेगाव तालुक्यातील खडकी येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्याची प्रतिकात्मक लागवड करण्यात येणार आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ पासून तणनाशक-प्रतिरोधक तंत्रज्ञान असलेले HTBT कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत या तंत्रज्ञानाला मान्यता न मिळाल्याने शेतकरी नव्या कृषी तंत्रज्ञानापासून वंचित राहत आहेत. याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने १० जून रोजी गुजरात सीमेवरील नंदुरबार येथे सविनय कायदेभंग आंदोलन करून गुजरातमधून प्रतिबंधित HTBT बियाणे महाराष्ट्रात आणल्याचा दावा केला आहे.
या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून १७ जून रोजी दुपारी १२ वाजता खडकी (ता. राळेगाव) येथील राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात ‘प्रतिबंधित बियाण्याची लागवड’ आणि ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी संघटनेच्या मते, शेतकऱ्यांना कोणते बियाणे वापरायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. शासनाने नवीन कृषी तंत्रज्ञानावर निर्बंध घालण्याऐवजी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी संघटनेची मागणी आहे.
या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप, ललित बहाळे, सी. डी. मायी, अनिल घनवट यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रतिबंधित बियाण्यांच्या लागवडीच्या घोषणेमुळे कृषी क्षेत्रात पुन्हा एकदा HTBT कापूस बियाण्यांच्या मान्यतेचा मुद्दा चर्चेत आला असून या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.