IPL 2026: आयपीएल सुरू होण्याआधीच मोडला जुना रेकॉर्ड; सर्व कर्णधारांनी मिळून रचला नवा इतिहास!

आयपीएल २०२६ (IPL 2026) साठी रंगतदार तयारी पूर्ण झाली असून सर्व संघ आपल्या रणनीतीला अंतिम स्वरूप देत आहेत. बहुतेक संघ सध्या सराव सामने खेळण्यात व्यस्त आहेत. यादरम्यान, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशा प्रकारे सर्व १० कर्णधारांनी मिळून इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील असा एक विक्रम मोडला आहे, जो गेल्या १९ वर्षांपासून अबाधित होता.
वास्तविक पाहता, १९ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडणार आहे की, आयपीएलच्या एखाद्या हंगामात सर्व १० संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडूंच्या हाती असेल. २०२६ च्या हंगामात सहभागी असलेल्या सर्व १० संघांचे कर्णधार भारतीय असतील. विशेष म्हणजे, यापूर्वी सर्व संघांचे कर्णधार भारतीय असण्याची घटना घडली आहे, परंतु स्पर्धेत १० संघ सामील झाल्यानंतर असे पहिल्यांदाच घडत आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही, त्यामुळे इशान किशनकडे सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत इशान संघाची धुरा सांभाळताना दिसेल. कमिन्स वगळता उर्वरित ९ संघांचे कर्णधार आधीच भारतीय होते. आता सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी हैदराबादची कमानही भारतीय खेळाडूच्या हाती आल्याने हा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
इशान किशन आयपीएलमध्ये एखाद्या संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असेल. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे इशानला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कप्तानीचा चांगला अनुभव आहे. त्याने २०२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या नेतृत्वाखाली झारखंडला विजेतेपद मिळवून दिले होते. या कामगिरीनंतरच इशानची २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती. टी-२० विश्वचषकात त्याने आपल्या बॅटने कमाल करत ‘मेन इन ब्लू’ला (भारतीय संघाला) जेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.
Comments are closed.