योगी आदित्यनाथ यांचे संगम येथे पवित्र स्नान
सहकारी मंत्र्यांचीही उपस्थिती : प्रयागराजमध्ये मंत्रिमंडळ बैठक
वृत्तसंस्था/ .प्रयागराज
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांसह त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. तसेच महाकुंभमेळ्यादरम्यान पूजाही केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी एका खास बोटीतून प्रवास केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात बुधवारी प्रयागराजमध्ये मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी यासंबंधी पत्रकारांना माहिती दिली.
प्रयागराज-चित्रकूट विकास क्षेत्रासोबतच नीती आयोगाच्या मदतीने वाराणसीमध्ये एक विकास क्षेत्र विकसित केले जाईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. योगी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रयागराजच्या इतर अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये प्रयागराज विंध्य प्रदेश आणि वाराणसी विंध्य प्रदेशाची निर्मिती, गंगा एक्स्प्रेसचा मध्यप्रदेशच्या सीमेवरील रेवापर्यंत विस्तार, बुंदेलखंड एक्सप्रेसचाही रेवापर्यंत विस्तार केला जाईल, असे सांगण्यात आले. त्याव्यतिरिक्त वाराणसी, प्रयागराजसह सात जिह्यांना धार्मिक क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. प्रयागराज, वाराणसी आणि आग्रा येथे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मुरादाबादमध्ये 10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
संपूर्ण मंत्रिमंडळ पहिल्यांदाच महाकुंभात उपस्थित आहे. राज्याच्या विकासाशी संबंधित धोरणांवर चर्चा झाली. प्रयागराजशी संबंधित मुद्यांवरही चर्चा झाली. उत्तर प्रदेश एरोस्पेस आणि संरक्षण आणि रोजगार धोरणाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे नूतनीकरण केले जाईल, असे सांगण्यात आले. तसेच अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत.
Comments are closed.