उत्तरमध्ये दंगल घडवून आणण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे योगी म्हणाले
आझम यांना गृहमंत्री करण्याच्या घोषणेवर बरसले
वृत्तसंस्था, लखनौ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेस अन् समाजवादी पक्षावर निशाणा साधला. सप महासचिव शिवपाल यादव यांनी आझम खान यांना गृहमंत्री करण्याच्या घोषणेला योगींनी दंगली रचण्याच्या कटाशी जोडले आहे. विरोधकांची ही मानसिकता अत्यंत लज्जास्पद असून जनतेने यातून धडा घेण्याची आवश्यकता असल्याचे योगींनी म्हटले आहे.
काँग्रेसने मोहम्मदाबादच्या नवाबाची संपत्ती वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, तर तो नवाब मुस्लीम लीगचा खजिनदार होता, जो देशाची फाळणी अन् स्वातंत्र्याच्या विरोधात होता, त्याच्या नावावर विद्यापीठ निर्माण करणाऱ्यांचा आज समाजवादी पक्ष पुरस्कार करत आहे. सत्तेवर आल्यास आझम खान यांना गृहमंत्री करू असे समाजवादी पक्ष म्हणत आहे, समाजवादी पक्ष राज्यात पुन्हा दंगली भडकवू इच्छितात, मुजफ्फरनगर आणि सहारनपूरच्या दंगलखेरांना समाजवादी पक्षाचे सरकार असताना सन्मानित केले जात होते असा दावा योगींनी केला आहे.
फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार
फाळणी अन् त्यानंतर झालेल्या नरसंहारासाठी काँग्रेस जबाबदार आहे. सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने एका समृद्ध राष्ट्राचे विभाजन केले. पंजाब अन् सिंध यासारख्या मागणी नसलेले प्रांत पाकिस्तानला देण्यात आल्याचा आरोप योगींनी केला आहे.
मतपेढीसाठी विरोधकांचे मौन
बांगलादेशात अलिकडेच हिंदूंवर झालेल्या अत्याचारावर काँग्रेस अन् समाजवादी पक्षाने मौन बाळगले. मतपेढी गमाविण्याची भीती काँग्रेस अन् समाजवादी पक्षाला होती. या घटना म्हणजे एक धडा आहे, या घटना वर्तमान पिढी अन् आगामी पिढीला समजाविण्याचे एक माध्यम देखील असतात. योग्य पद्धतीने स्वत:चे म्हणणे पोहोचविण्याची पद्धत आम्हालाही अंगिकारावी लागेल असे योगींनी म्हटले आहे.
देशाच्या विरोधकांपासून सजग
आमचा शत्रू अन् देशाचा विरोधक अराजकता फैलावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो रोखणे आमची जबाबदारी आहे. विकासात अडथळे ठरणाऱ्यांना हटविण्यासाठी आपण सर्वांनी स्वत:च्या पद्धतीने योगदान देणे आवश्यक आहे. एक नागरिक म्हणून आम्हाला सजग रहावे लागणार आहे असे उद्गार योगींनी काढले आहेत.
Comments are closed.