'मी मरायला तयार…', अरेरे.. युवराज सिंगच्या वडिलांवर हे काय दिवस आले…

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील खोल वेदना मोकळेपणाने व्यक्त केल्या. द विंटेज स्टुडिओशी बोलताना त्यांनी अनेक वर्षांपासून मनात साचलेल्या भावना उघड करताना स्वतःच्या मृत्यूबद्दलही उल्लेख केला.

मुलाखतीत योगराज सिंग म्हणाले की, सध्या त्यांना दैनंदिन आयुष्यातही इतरांवर अवलंबून राहावं लागत आहे. “आता जेवणासाठीसुद्धा कधी कोणावर तर कधी दुसऱ्यावर तग धरावा लागतो. आयुष्य आता पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. देवाची इच्छा असेल तेव्हा मला घेऊन जाईल, मी तयार आहे,” असे ते भावनिक होत म्हणाले. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची हतबलता आणि मानसिक थकवा स्पष्ट जाणवत होता.

योगराज सिंग यांनी आपल्या भूतकाळातील कठीण प्रसंगांबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांना तेव्हा बसला, जेव्हा युवराज आणि त्याची आई शबनम त्यांना सोडून गेली. “जिच्यासाठी मी आयुष्य दिलं, तीच व्यक्ती मला सोडून जाईल यावर विश्वास बसत नव्हता. त्या काळात मी कोसळून गेलो होतो,” असे त्यांनी सांगताना जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्याचे दिसून आले.

क्रिकेट करिअरबद्दल बोलायचं झाल्यास योगराज सिंग यांनी भारताकडून 1 कसोटी आणि 6 वनडे खेळले. त्यांनी कसोटीमध्ये 1 विकेट आणि वनडेमध्ये 4 विकेटस् घेतल्या. छोट्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये त्यांनी एकूण 11 धावा आणि 5 विकेटस् नोंदवल्या.

स्वतःचा क्रिकेट प्रवास जरी मर्यादित राहिला असला तरी योगराज सिंग यांनी आपल्या मुलामध्ये ते अपूर्ण स्वप्न पाहिले. कठोर मेहनत आणि कठोर शिस्त लावून त्यांनी युवराज सिंगसारखा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू घडवला. 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक विजयात युवराज सिंहचा मोठा वाटा होता आणि या यशाच्या मागे योगराज सिंह यांची छुपी पण महत्त्वाची भूमिकाही होती.

Comments are closed.