…तर हिंदुस्थानी क्रिकेटचा इतिहास पुसून टाकावा लागेल, गिलला वगळल्याबाबत योगराज सिंगचा स्फोटक हल्ला

शुभमन गिलला वगळण्याचा निर्णय म्हणजे बुद्धीला न पटणारा अन्याय आहे, कालपर्यंत जो खेळाडू उपकर्णधार होता, तो आज अचानक बाहेर जाण्याइतका वाइट कसा ठरू शकतो? जर चार-पाच डावांत धावा झाल्या नाहीत म्हणून खेळाडूला बाहेर काढायचं असेल तर मग हिंदुस्थानी क्रिकेटचा इतिहासच पुसून टाकावा लागेल, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी बीसीसीआय आणि निवड समितीला धारेवर धरले.

हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये निवड आणि वगळणे हे वाद नवे नाहीत. पण जेव्हा तरुण, गुणवत्तावान आणि भविष्यातील कर्णधार मानल्या गेलेल्या खेळाडूवर जेव्हा कुऱहाड चालवली जाते तेव्हा प्रश्न केवळ संघनिवडीचा राहत नाही. तो न्यायाचा ठरतो. टी-20 वर्ल्ड कप संघातून शुभमन गिलला वगळण्याच्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ उडवली असून या निर्णयावर सर्वात स्पह्टक प्रतिक्रिया योगराज सिंग यांनी दिली आहे.

चारपाच डाव अपयशी ठरले म्हणून खेळाडू संपतो का?

एका ‘यूटय़ूब’ कार्यक्रमात बोलताना योगराज म्हणाले, ‘जर चार-पाच डावांत धावा झाल्या नाहीत. खेळाडू अपयशी ठरला म्हणून त्याला बाहेर काढायचं असेल तर मग हिंदुस्थानी क्रिकेटचा इतिहासच पुसून टाकावा लागेल!’ याआधी अनेक खेळाडूंना दीर्घकाळ संधी देण्यात आल्या. अपयशी असूनही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला. वारंवार खेळण्याची संधी देत त्यांना आजमावले. मग शुभमन गिलसाठीच वेगळे निकष का? उद्या अभिषेक शर्मा दोन-तीन डावांत फसला तर त्यालाही बाहेर बसवणार का? संघव्यवस्थापनाचे काम खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणे असते, त्यांना अपयशी ठरताच अपराध्यासारखे कोर्टात उभे करायचे नसते, असा घणाघातही त्यांनी केला.

कपिल देवांचाही दिला दाखला

योगराज सिंग यांनी 1983 च्या विश्वविजेत्या कर्णधार कपिल देव यांचं उदाहरण देत निवडकर्त्यांना आरसा दाखवला. एक काळ असा होता की कपिल देव फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत संघर्ष करत होते. पण तत्कालीन कर्णधार बिशन सिंग बेदी यांनी त्यांच्यावरचा विश्वास डळमळू दिला नाही आणि त्याच विश्वासातून इतिहास घडला. तोच संयम शुभमन गिललाही मिळायला हवा होता, असे योगराज यांनी ठामपणे सांगितले.

Comments are closed.