अदानीला 33 हजार कोटींचे कर्ज देता, आम्हाला 33 हजारांचे तरी द्या ! ठाण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

अदानी समूहाला ३३ हजार कोटींचे कर्ज तुम्ही देता, पण सर्वसामान्य तरुण उद्योजकांना एक लाखाचे कर्जही मिळत नाही. ३३ हजार कोटी सोडा, पण आम्हाला ३३ हजारांचे तरी कर्ज द्या, अशी मागणी सरकारकडे करत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ठाण्यात अनोखे आंदोलन केले. एलआयसी कार्यालयासमोरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. ‘मोदी-अदानी भाई भाई.. दोघे मिळून देश लुटून खाई’ अशा घोषणांनी एलआयसीचा परिसर दणाणून गेला.

अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून वाचवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एलआयसीचा वापर केला असून त्यांचे ३३ हजार कोटी रुपये अदानी समूहामध्ये गुंतवण्यास भाग पाडले आहे. याबाबतचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध होताच हिंदुस्थानात सर्वत्र खळबळ उडाली. सरकारच्या या चापलुसीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जोरदार आंदोलन केले. तरुण उद्योजकांनादेखील भांडवली कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली.

गोरगरीब मुलांनाही निधी द्या !
केंद्रातील मोदी सरकार अदानीसारख्या एकाच उद्योजकाला झुकते माप देत आहे. एलआयसीवर दबाव आणण्यात टाकण्यात आला. त्यानंतर ३३ हजार कोटी रुपये अदानी समूहामध्ये गुंतवण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे पैसे दिले जात असतील तर गोरगरीब मुलांनादेखील निधी द्यावा. या तरुणांनाही स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. मोदी सरकारने त्यांचाही विचार करण्याची गरज असल्याचे मनोज प्रधान यांनी सांगितले.

ते सरकारचे जावई आहेत काय?
अमेरिकेत अदानींची चौकशी सुरू आहे. असे असतानाही केंद्र सरकार जर गुंतवणूक करत असेल तर ती अत्यंत चुकीची बाब आहे. इतरही अनेक आंतरराष्ट्रीय बँका कर्ज देत असताना जर एलआयसी अदानी समूहामध्ये पैसे गुंतवणार असेल तर अदानी हे सरकारचे जावई आहेत काय, असा सवालही यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

Comments are closed.