'तुम्ही तुमचे मनोबल वाढवा, आणि आम्ही आव्हानांना तोंड देण्याची जबाबदारी घेऊ.'
लष्कर दिनानिमित्त सेनाप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा स्पष्ट संदेश
वृत्तसंस्था/जयपूर
जयपूरमधील 78 व्या लष्कर दिन परेडनंतर, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय सैन्याच्या बदलत्या स्वरूपावर आणि भविष्यातील तयारीवर एक प्रमुख विधान केले. भारतीय सैन्य आता सध्याच्या धोक्यांपुरते मर्यादित नाही, तर भविष्यातील लढायांसाठी सतत स्वत:ला तयार करत आहे. गेल्या काही वर्षांत, भारतीय सैन्याच्या विचारसरणीत बदल झाला आहे. आम्ही भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन मिशन-ओरिएंटेड आणि भविष्यासाठी तयार लष्करी रचना विकसित करत आहोत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच त्यांनी सर्वसामान्यांना आवाहन करताना तुम्ही केवळ सैन्याचे मनोबल वाढवा आणि सेना इतर सर्व आव्हानांना पूर्ण क्षमतेने तोंड देण्यास सक्षम असल्याचा निर्वाळा दिला.
या वर्षीच्या आर्मी डे परेडमध्ये शक्तिमान भैरव बटालियन आणि दिव्यांश पेट्रोल युनिटचे प्रदर्शन करण्यात आले. ही युनिट्स भविष्यातील युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून ती जलद, अचूक आणि मिशन-आधारित ऑपरेशन्स करण्यास सक्षम असल्याचे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. भारतीय सेना बदलत्या युद्धशैलींशी जुळवून घेण्यासाठी दररोज स्वत:ला अपग्रेड करत आहे. भारतीय सेना कोणत्याही आव्हानाला आणि कोणत्याही हल्ल्याला नेहमीच उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भविष्यातील युद्ध विकसित होत राहील आणि भारतीय सेना कालांतराने स्वत:ला बळकट करत राहील, असा दावाही लष्करप्रमुखांनी केला.
स्वावलंबन हा सर्वात मजबूत पाया
जनरल द्विवेदी स्वदेशीकरणाबाबत म्हणाले, आपल्याला भारतात डिझाइन आणि उत्पादित उपकरणांनी सुसज्ज सैन्याची आवश्यकता आहे. स्वदेशीकरण आता केवळ एक धोरणात्मक निवड नाही तर राष्ट्रीय गरज आहे. परेडमध्ये प्रदर्शित केलेले स्वदेशी ड्रोन, जॅमर सिस्टम, मोबाइल ड्रोन ऑपरेटर युनिट्स आणि उपग्रह संप्रेषणाने सुसज्ज ओबी व्हॅन हे स्वावलंबी भारताच्या या दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत. तंत्रज्ञानाचा वापर सैनिकाची जागा घेण्यासाठी नाही तर त्याला सक्षम करण्यासाठी केला जात असल्याचेही लष्करप्रमुखांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी नेटवर्किंग, डेटा-केंद्रित ऑपरेशन्स आणि रिअल-टाइम निर्णय घेण्याचे भविष्यातील युद्धाचा पाया म्हणून वर्णन केले.
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना लष्करप्रमुख म्हणाले, या ऑपरेशनने भारतीय सैन्याच्या जलद प्रतिसाद आणि अचूक लक्ष्यीकरण क्षमता सिद्ध केल्या आहेत. या मोहिमेची वर्णन त्यांनी राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार असलेल्या जबाबदार आणि सक्षम दलाचे प्रतिबिंब म्हणून केले. याप्रसंगी त्यांनी राजस्थानच्या योगदानावरही भाष्य केले. यंदा आम्ही आर्मी डे परेड राजस्थानमध्ये आयोजित केली. कारण मोठ्या संख्येने आर्मीचे सर्वात धाडसी सैनिक राजस्थानमधून येतात, असे म्हणाले.
Comments are closed.