ऑस्ट्रेलियात यंग इंडियाचा विजयी डंका, सूर्यवंशी, मल्होत्रा आणि कुंडूचा झंझावात; हिंदुस्थानच्या युवा संघाने जिंकली मालिका

एकीकडे टीम इंडिया आशिया कप गाजवतेय तर दुसरीकडे यंग इंडियाने ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घातलाय. वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कुंडू यांनी झंझावाती सत्तरी करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकत आपला डंका वाजवला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या दौऱयात हिंदुस्थानी युवा संघाने जोरदार सुरूवात करताना पहिल्या वन डेतही यजमानांचा 117 चेंडू आणि 7 विकेटनी धुव्वा उडवला होता. आता त्याच विजयाची पुनरावृत्ती दुसऱया सामन्यातही करण्यात आली. पहिल्या सामन्यातही वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंडू यांनी सहा षटकारांचा पाऊस पाडला होता, तर या सामन्यात आठ षटकार ठोकले. कुंडूने या सामन्यात 87 धावांची घणाघाती खेळी केली होती. तेव्हा वैभवनेही 22 चेंडूंत 38 धावा चोपल्या होत्या. आता दुसऱया सामन्यात अपेक्षेप्रमाणे कर्णधार आयुष म्हात्रे (0) लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर सूर्यवंशीने विहान मल्होत्राच्या साथीने 117 धावांची भागी रचली. दोघांनीही आक्रमक प्रत्येकी 70 धावा केल्या. दोघांनी मिळून 7 षटकारांसह 12 चौकार खेचले. त्यानंतर अभिज्ञान कुंडूने 71 धावांचा वर्षाव करत संघाला त्रिशतकासमीप नेले. बरोबर 300 धावांवर यंग इंडिया बाद झाली.
जयडेन Draperne ठोके वाढवले
हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जोरदार धक्के दिले. त्यांचा एकही आघाडीचा फलंदाज फार काळ टिकला नाही. त्यामुळे 30 षटकांत 6 बाद 109 अशी मजल मारणारा ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला होता. त्याचा पराभव समोर उभा होता. मात्र तेव्हाच सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेडनने हिंदुस्थानी गोलंदाजीला फोडून काढण्याचे धाडस दाखवत सामन्याचा थरार वाढवला. त्याने सहा षटकार आणि आठ चौकारांचा वर्षाव करत 65 चेंडूंतच शतक साकारले. तेव्हा विजय ऑस्ट्रेलियाच्या आवाक्यात आला होता. पण 43 वे षटक निर्णायक ठरले. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या आयुष म्हात्रेने आपल्या पहिल्याच षटकात ड्रेपरची विकेट काढत हिंदुस्थानी संघाच्या जिवात जीव आणला. तेव्हा ऑस्ट्रेलियाला 44 चेंडूंत 80 धावांची गरज होती. पण जेडन बाद होताच ऑस्ट्रेलिया पुन्हा बॅकफूटवर पडला. पुढे म्हात्रेने आर्यन शर्मा आणि हेडन शिलरचीही विकेट काढत हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. अखेर ऑस्ट्रेलियाचा डाव 47.2 षटकांत 249 धावांवर संपला आणि हिंदुस्थानच्या युवा संघाने सामन्यासह मालिकेतही 2-0 अशी आघाडी घेतली. आता औपचारिकता असलेला तिसरा सामना शुक्रवारी खेळला जाईल.
सूर्यवंशीने मोडला षटकार विक्रम
‘षटकाराची मशीन’ असलेल्या वैभवने या सामन्यात चक्क सहा षटकार मैदानात भिरकावले आणि युवा वन डे सामन्याच्या इतिहासात सर्वाधिक 38 षटकारांचा उन्मुक्त चंदचा विक्रमही मोडीत काढला. आता वैभव 41 षटकारांसह टॉपवर आहे. वैभवचा टी-20 आणि वन डे क्रिकेटमध्ये षटकारांचा तुफान वेगाने वाढतच चालला आहे.
Comments are closed.