बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी तरुण ठार

बिबट्याच्या हल्ल्यात मोलमजुरी करणाऱ्या 22 वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आली. पप्पू बाळू दुधवडे असे त्या तरुणाचे नाव असून तो संगमनेर मधील ब्राह्मणवाडा म्हसवंडी येथे राहत होता.

पप्पू हा त्याचे आई, वडील व एक भाऊ आणि वहिणी यांच्यासोबत राहायचा. हे संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते. शनिवारी सकाळी 7 वाजता पप्पू हा मजूरीसाठी बेलापूर गावी गेला होता. परंतु रात्री घरी परतत असताना गाडीचे पेट्रोल संपल्याने पायी येत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तो जागीच गतप्राण झाला. रविवारी सकाळी रवींद्र दुधवडे हा तरुण मोलमजुरीसाठी त्याच रस्त्याने जात असताना त्याला पप्पूचा मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान परिसरात वाघ, बिबट्या, तरस,कोल्हे, लांडगे अशा हिंस्र प्राण्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. जुन्नर तालुक्यात नरभक्षक बिबटे पकडून अकोले तालुक्याच्या वनक्षेत्रात सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेने बेलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने सदर नरभक्षक बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Comments are closed.