Jalna News – मामीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या
जालना जिल्ह्यात हत्यासत्र थांबण्याचं नावच घेत नाही. जालना तालुक्यातील गोंदेगाव येथे मामीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. मच्छिंद्र कोंडीबा दराडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो अंबड तालुक्यातील पानेगाव येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हत्यासत्राच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गोंदेगाव येथील 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सोमवारी पहाटे मच्छिंद्रचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. डोक्यावर दगडाने वार करून त्याची निर्दयी हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. मच्छिंद्र आपल्या मामीच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदेगाव येथे आला होता. अंत्यसंस्कारानंतर तो नातेवाईकांकडे थांबला होता. रात्री अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी त्याचा मृतदेहच सापडला.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पथकाने पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
Comments are closed.