सरकारचा हरवलेला ‘विकास’ वडवणीच्या सहा तरुणांना सापडला! डबघाईला आलेल्या शाळेचे रूपडेच बदलले, प्रवेशासाठी शाळेसमोर रांग लागली

>> उदय जोशी

सरकार नावाची काही एक गोष्ट असते हे गेल्या काही वर्षांत विसरायला झाले आहे. मातीवर सिमेंट ओतले म्हणजे विकास झाला असा सरकारी समज ! त्यातही शैक्षणिक क्षेत्रात विकासाची बोंबाबोंबच ! पण वडवणीतील सहा तरुणांनी एकत्र येऊन सरकारलाही लाज वाटावी असे टोलेजंग काम उभे केले! ज्या ठिकाणी पिढी घडवण्याचे काम होते, त्या शाळेचाच या तरुणांनी कायापालट केला. शाळेकडे पाठ फिरवणारेच आता प्रवेशासाठी या शाळेसमोर रांगेत उभे असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय. ग्रामीण विकासाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद या कार्यालयात आहे, परंतु अलिकडे जिल्हा परिषद रिकामटेकड्यांची चावडी बनली आहे. आरोग्य, शिक्षण यासारख्या समाजाभिमुख विकासाचाही जिल्हा परिषदेला विसर पडला आहे. एकेकाळी जिल्हा परिषदेच्या शाळांनी संस्कारक्षम पिढ्या घडवल्या. समाजाच्या विविध क्षेत्रात हीच पिढी आज काम करत आहे. परंतु मागच्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळा भकास, ओसाड बनल्या. शाळेतील शिक्षक शिकवण्यापेक्षा राजकारणातच रमले. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही कॉन्व्हेन्टची वाट धरली. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांची ही अवस्था! वडवणीची रामबाग शाळाही दुरवस्थेला अपवाद नव्हती. इमारत मोडकळीस आली, शौचालय नाही, स्वच्छतागृह नाही, वर्गात बाकडे नाहीत, फुटलेल्या फरशा, चिरा पडलेल्या भिंती, पावसाळ्यात कोसळणाऱ्या जलधारा…

जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा जागेअभावी तब्बल पंधरा वर्षे राम मंदिरात भरत होती. नंतर एका मंगल कार्यालयात भरू लागली. पुढे सरकारने चार खोल्या बांधून दिल्या. कोरोनाच्या काळात शाळेची अधिकच परवड झाली. शाळेची ही अवस्था पाहून नगरसेवक नागेश डिगे, शंकर झाडे, विष्णू टकले, विक्रम मुंडे आणि गणेश टकले हे सहा तरुण अस्वस्थ झाले. सरकारकडे जाऊन उपयोग नाही हे स्पष्ट झाल्यानंतर या सर्वांनी स्वतःच शाळेचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. शाळेत शिकलेल्या सर्वांशी संपर्क साधून त्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले. चार महिन्यात एक देखणी शाळा उभी राहिली! शाळेचे बदललेले रूप पाहण्यासाठी आता अधिकारी येत आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आले होते. जे आपण करू शकलो नाही, ते गावातल्या सहा तरुणांनी करून दाखवल्याबद्दल त्यांनी मोठ्या मनाने समाधान व्यक्त केले. आता या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आपल्या शाळेला दान देण्यासाठी गावकऱ्यांनी सढळ हाताने मदत केली. प्रत्येकाने काहींना काही वस्तू, साधन शाळेमध्ये पोहच केले. ज्यांची परिस्थिती जेमतेम आहे त्यांनी श्रमदान केले. या श्रमदानातून शाळेचा परिसर स्वच्छ झाला. वृक्षारोपण झाले. काहीनी रंगरंगोटी आणि पेंटिंगची कामे केली आणि उभे राहिले विद्येचे मंदिर. हे विद्यामंदिर केवळ वस्तूनेच भरले नाही, तर या शाळेमध्ये मुला-मुलींसाठी वेगळे बाथरूम, शौचालय, शिक्षक-शिक्षिकांसाठी वेगळे बाथरूम, शौचालय याचीही व्यवस्था करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था शोचनीय आहे. शिक्षण विभागाचे त्याकडे लक्ष नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळा गलेलठ्ठ फिसवर चालतात. आपल्या शाळा कुणी वाचवायच्या? केवळ गुणवत्ता असून उपयोग नाही, विद्यार्थ्यांना स्वच्छ हवा, पाणी हवे. आम्ही अर्जाचे ढीग लावले. पण उपयोग झाला नाही. शेवटी आम्हीच पुढाकार घेतला. गावकरीही मदतीला तयार झाले. सगळ्यांच्या मेहनतीमधून शाळेचा कायापालट झाला.

नागेश डिगे, नगरसेवक, वडवणी

दरम्यान, तरुणांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी आपल्या शाळेसाठी दातृत्व दाखवले आणि शाळेला या वस्तू भेट दिल्या.

विद्यार्थ्यांसाठी सहा फळे

  • दहा चाहते
  • 42 इंच 6 लीड
  • प्रोजेक्टर १
  • पाण्याच्या दोन हजार लिटरच्या टाक्या २
  • शिक्षकांसाठी टेबल ६
  • इन्व्हर्टर बॅटरीसहित १
  • खुर्चा २०
  • साऊंड सिस्टीम २
  • गॅस भट्टी १
  • पाणी फिल्टर 1
  • पूर्ण प्रकाश फिटिंग
  • विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन

Comments are closed.