व्हिसाच्या कचाट्यात युवा कुस्तीपटू; 72 खेळाडूंच्या सहभागावर टांगती तलवार, दक्षिण आफ्रिकेच्या उड्डाणापूर्वीच प्रशासकीय अडथळ्यांचा फास
प्रतिस्पर्ध्यांना कुस्तीच्या आखाड्यात चीतपट करण्यासाठी सज्ज झालेल्या हिंदुस्थानच्या युवा मल्लांना आता आखाड्याबाहेरच मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या राष्ट्रपुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी व्हिसाचा पेच निर्माण झाल्याने तब्बल 72 कुस्तीपटूंच्या सहभागावर टांगती तलवार आहे. यात 17 वर्षांखालील 60 आणि 20 वर्षांखालील सुमारे 12 खेळाडूंचा समावेश आहे. निवड चाचण्या, सराव शिबिरे आणि पदकांसाठीची तयारी पूर्ण झालेली असताना आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दार व्हिसाच्या अडथळय़ामुळे बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील पोलोक्वान येथे 4 ते 6 डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. हिंदुस्थानी संघाचे खेळाडू 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर टप्प्याटप्प्याने रवाना होणार आहेत, मात्र अल्पवयीन खेळाडूंना नियमित ई-ट्रव्हल ऑथरायझेशन (ईटीए) प्रक्रियेतून अर्ज करता येत नाही. त्यांना व्हीएफएस ग्लोबल किंवा वाणिज्य दूतावासाच्या मार्गाने व्हिसा घ्यावा लागतो. ऑक्टोबरपासून दिल्ली, गुरुग्राम, जयपूर आणि कोलकातासह काही पेंद्रांवर अल्पमुदतीच्या व्हिसा अर्जांची प्रक्रिया तात्पुरती स्थगित असल्याने अडचण अधिक गंभीर बनली आहे.
ई-व्हिसासाठी पालकांचे पासपोर्ट आणि न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरणाचे संमतीपत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक पालकांकडे पासपोर्ट नसणे, खेळाडूंच्या नावातील आडनावासंबंधी अडचणी यामुळे प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची झाली आहे. हिंदुस्थानी कुस्ती महासंघाने दक्षिण आफ्रिकेच्या उच्चायुक्तालयाशी संपर्प साधण्याचा प्रयत्न केला; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे वृत्त आहे.
Comments are closed.