पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या, वसमत शहर ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. गणेश डिंगाबर गुंडाळे (22) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे वसमत शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील सोमवार पेठ परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. ‘तू पोलिसांना टिप का देतो’ असे विचारत गणेशची दगड-विटांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गणेश गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. पवन माणिकराव डाखोरे (27) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ऋषिकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी, अनिकेत देवकर या तिघांविरूद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक परगेवार हे करीत आहेत.
दरम्यान, आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी गणेशच्या कुटुंबियांनी वसमत शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांकडून आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, कुटुंबियांच्या ठिय्या आंदोलनामुळे काही वेळासाठी पोलीस ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
Comments are closed.