नववर्षाला युवा वर्ल्ड कपचा धुरळा उडणार, हिंदुस्थानची मोहीम 15 जानेवारीपासून; हरारेत रंगणार अंतिम सामना

आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या युवा अर्थातच अंडर-19 एकदिवसीय वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले असून हा क्रिकेट सोहळा झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये प्रथमच खेळवला जाणार आहे. 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण 16 संघ खेळणार असून त्यांच्यात एकंदरीत 41 सामने खेळविले जाणार आहेत. या क्रिकेट युद्धाचा अंतिम सामना हरारे स्पोर्ट्स क्लबवर होईल. विशेष म्हणजे, या स्पर्धेत हिंदुस्थान व पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना वेगवेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे.

चार गट आणि सुपर सहा

या स्पर्धेत 16 संघांना चार गटांत विभागण्यात आले आहे. साखळीतून अव्वल  तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर चार संघ उपांत्य फेरी गाठतील व अखेरीस हरारे येथे विजेतेपदाचा संग्राम होईल. पहिल्याच दिवशी हिंदुस्थान आपली मोहीम अमेरिकेविरुद्ध सुरू करणार असून झिम्बाब्वेचा स्कॉटलंडशी सामना खेळविला जाईल. या स्पर्धेद्वारे टांझानिया पदार्पण करत एसून वेस्ट इंडीजविरुद्ध ते आपला सलामीचा सामना खेळतील. जपानचा संघही 2020 नंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कपमध्ये आपला खेळ दाखवेल.

हिंदुस्थानला ‘अ’ गटात स्थान देण्यात आले असून अमेरिका, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे अन्य संघ असतील. ‘ब’ गटात झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड, स्कॉटलंड, तर ‘क’ गटात गतविजेता ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जपान, श्रीलंका आणि ‘ड’ गटात टांझानिया, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश करण्यात आला आहे.

हिंदुस्थानची वर्ल्ड कप मोहीम 15 जानेवारीपासून अमेरिकेविरुद्ध सुरू होईल. त्यानंतर 17 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध, तर24 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळेल. हिंदुस्थानच्या सर्व साखळी लढती बुलावायो येथेच खेळविल्या जाणार आहेत. गतवर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानच्या युवा संघाचे जगज्जेतेपदाचे स्वप्न ऑस्ट्रेलियाने भंग केले होते. त्यामुळे हिंदुस्थानी तरुण वाघांनी पुन्हा एकदा जगज्जेतेपदावर झडप घालण्याची तयारी सुरू केली आहे.

पाच मैदानांवर समोर

या विश्वचषकाच्या लढती झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लब, ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब तसेच नामिबियातील नामिबिया क्रिकेट ग्राउंड व एचपी ओव्हल येथे होणार आहेत.

Comments are closed.