एमएचटी-सीईटीच्या पेपरात चुका करणाऱ्यांवर कारवाई करा,युवासेनेची आयुक्तांकडे मागणी

एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत 50 पैकी 21 चुकीचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱयांवर कारवाईची मागणी युवासेनेने केली आहे. तसेच सीईटी सेलच्या कारभारात सुधारणा करून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा व निकाल वेळेत लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.


27 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या गणित विषयाच्या प्रवेश परीक्षेत 50 पैकी 21 प्रश्नांमध्ये चुका असल्याची गंभीर बाब समोर आली होती. ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न सीईटी सेलने केला. इतके प्रश्न चुकीचे विचारले गेल्याने परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की सीईटी सेलवर आली. सीईटी सेलच्या या गोंधळी कारभारामुळे जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यावी लागली. पुन्हा परीक्षा देण्याच्या मनस्तापाबरोबरच अनेक विद्यार्थ्यांचे सुट्टीचे नियोजन यामुळे कोलमडले. अनेक विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्याची दखल घेत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची भेट घेऊन या गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणी केली.

सीईटी-सेलच्या कारभारावरूनही युवासेनेने सीईटी-सेलला धारेवर धरले. नुकताच राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र सीईटी सेलच्या प्रवेश परीक्षा अजूनही प्रलंबित आहेत. झालेल्या अनेक परीक्षांचे निकाल लागलेले नाहीत. त्यांचे निकाल कधी लागणार या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. निकाल जाहीर करण्यास होणाऱया विलंबामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया लांबत आहेत.

– मागील वर्षीही सीईटी सेलने निकाल उशिरा व चुकीचा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व प्रवेश प्रक्रिया लांबल्या. परिणामी अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकले नाहीत. बीएमएस अभ्यासक्रमाचे प्रवेश दिवाळीनंतर सुरू झाले होते. यावर्षी या चुका होऊ नयेत याकरिता उपाययोजना करण्याची मागणी युवासेनेने केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनादेखील यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांची पैफियत मांडणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Comments are closed.