'झेड-मोड' बोगद्याचे आज उद्घाटन झाले

पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरला भेट देणार

न्यूज एजन्सी/ श्रीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, 13 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग भुयारी प्रकल्पाचे म्हणजेच ‘झेड-मोड’ बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे तेथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सोनमर्ग वर्षभर पर्यटनासाठी खुला ठेवण्याच्या उद्देशाने हा बोगदा किंवा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. हा प्रकल्प प्रादेशिक विकास आणि कनेक्टिव्हिटीमधील एक ऐतिहासिक पाऊल मानला जातो. ‘झेड-मोड’ बोगद्याचे महत्त्व केवळ सामान्य नागरिक आणि पर्यटकांपुरते मर्यादित नाही तर ते सैनिकांच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी देखील महत्त्वाचे आहे.

झेड-मोड भुयारी मार्ग गगनगीर ते सोनमर्ग पर्यंत पसरलेला असून त्याची लांबी 6.5 किमी आहे. या बोगद्याचे नाव ‘झेड-मोड’वरून पडले आहे. जम्मू काश्मीरमधील एक सुंदर पर्यटनस्थळ सोनमर्ग हिवाळ्यात होणाऱ्या मुसळधार बर्फवृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथील तापमान उणे 25 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. या काळात सुमारे चार महिने हा भाग 4 महिने देशाच्या इतर भागांपासून तुटलेला राहतो. आता या बोगद्यामुळे पहलगाम आणि गुलमर्गप्रमाणे सोनमर्ग वर्षभर पर्यटकांसाठी उपलब्ध होईल. यामुळे लेह-लडाखमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आणि प्रवाशांसाठी प्रवास करणे खूप सोपे होईल. हा दोन-लेनचा भुयारी मार्ग आहे. हा बोगदा सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

Comments are closed.