झिम्बाब्वेचा सुपर 8 संघांना सतर्कतेचा इशारा! ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला दणका

टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वे क्रिकेट संघ स्फोटक फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर, सिकंदर रझाच्या संघाने विजयाची हॅटट्रिक केली आणि स्पर्धेतील सह-यजमान श्रीलंकेलाही हरवले. सुपर ८ साठी आधीच पात्र ठरलेल्या दोन्ही संघांसाठी हा शेवटचा गट सामना होता. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना, श्रीलंकेने ७ बाद १७८ धावा केल्या. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, झिम्बाब्वेने तीन चेंडू शिल्लक असताना १८२ धावा केल्या आणि सहा विकेट्सने विजय मिळवला. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने नाबाद ६३ धावा केल्या तर कर्णधार रझाने ४५ धावांची धमाकेदार खेळी केली. या विजयासह, झिम्बाब्वेने श्रीलंकेला मागे टाकत ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. आता, झिम्बाब्वे सुपर ८ सामन्यांमध्ये अशाच कामगिरीवर आणि सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

झिम्बाब्वेने २०२१ च्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून स्पर्धेतील सर्वात मोठा धक्का दिला, ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढले. आता त्यांनी यजमानांना त्यांच्याच मैदानात हरवले. कर्णधार सिकंदर रझा आणि ब्रायन बेनेट हे झिम्बाब्वेच्या विजयाचे नायक होते. लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रायन बेनेटने एका टोक धरुन ४८ चेंडूत ६३ धावा केल्या. दरम्यान, चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या रझाने २६ चेंडूत ४५ धावांची धमाकेदार खेळी करत झिम्बाब्वेला विजय मिळवून दिला, ज्यामध्ये दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. या सामन्याला कलाटणी देणाऱ्या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

रझा आणि बेनेट व्यतिरिक्त, सलामीवीर तादिवानाशे मारुमानीने ३४ धावा केल्या. रायन बर्लने १२ चेंडूत २३ धावा केल्या. शेवटच्या षटकात षटकार मारणारा टोनी मुनयोंगा तीन चेंडूत आठ धावा करून नाबाद राहिला. त्याआधी, झिम्बाब्वेकडून सिंग मुझारबानी, ब्रॅड इव्हान्स आणि ग्रॅमी क्रिमर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

या विजयासह झिम्बाब्वेने श्रीलंकेची विजयी मालिका थांबवली. श्रीलंकेने यापूर्वी विजयांची हॅट्ट्रिक नोंदवली होती आणि सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले होते. सामन्यात श्रीलंकेसाठी पथुम निस्सांका आणि पवन रत्नायके यांनी शानदार फलंदाजी केली. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या निस्सांका यांनी ६२ धावांची खेळी करत संघाला शानदार सुरुवात दिली. त्यानंतर पवनने २५ चेंडूत ४४ धावा फटकावत संघाला १६० धावांच्या पुढे नेले. पवनने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. निस्सांका यांच्या खेळीत आठ चौकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकात दुनिथ वेलालेजने ८ चेंडूत १५ धावा करून संघाला १७८ धावांपर्यंत पोहोचवले, परंतु ही धावसंख्या विजयासाठी पुरेशी नव्हती. तथापि, श्रीलंकेचा संघ आता हा पराभव विसरून सुपर ८ सामन्यांवर लक्ष केंद्रित करेल.

झिम्बाब्वेने प्रभावी कामगिरीसह सुपर ८ संघांना त्यांना हलके घेऊ नये असा इशारा दिला आहे. सुपर ८ मध्ये झिम्बाब्वेचा सामना दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारताशी आहे. झिम्बाब्वेचा पहिला सुपर-८ सामना वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. त्यानंतर त्यांचा सामना भारताशी होईल आणि शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Comments are closed.