झिम्बॉब्वेचा ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला दणका, 6 विकेटनं दणदणीत विजय, सिंकदर रझानं करुन दाखवलं
श्रीलंका वि झिम्बाब्वे हायलाइट्स कोलंबो : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेनं त्यांच्या कामगिरीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. झिम्बॉब्वेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला देखील पराभवाचा धक्का दिला आहे. झिम्बॉब्वेनं श्रीलंकेवर 6 विकेटनं विजय मिळवला आहे. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 178 धावा केल्या होत्या. झिम्बॉब्वेनं 19 व्या ओव्हरमध्ये 182 धावा करत 6 विकेटनं विजय मिळवला. या विजयासह झिम्बॉब्वेनं ब गटात पहिलं स्थान पटकावलं आहे.
ZIM vs SL : झिम्बॉब्वेचा श्रीलंकेला दणका
झिम्बॉब्वेकडून ब्रायन बेनेट्ट यानं नाबाद 63 धावांची खेळी केली. त्याला सिकंदर रझानं 45 धावा आणि तदिन्वाशे मरुमनी यानं 34 धावा करत साथ दिली. या विजयानं झिम्बॉब्वेचा आत्मविश्वास वाढला आहे. झिम्बॉब्वेनं या वर्ल्ड कपमध्ये यापूर्वी ऑस्ट्रेलियाला पराभवाचू धूळ चारली होती.
श्रीलंकेनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणाऱ्या पाथुम निसांका यानं आजच्या मॅचमध्ये 62 धावा केल्या. तर, पवन रत्ननायके यानं 44 धावांची खेळी केली. कुशल परेरानं 22 धावा केल्या या जोरावर श्रीलंकेनं 7 बाद 178 धावा केल्या.
श्रीलंकेनं विजयासाठी झिम्बॉब्वेसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान त्यांनी 19.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आच्या मॅचमधील दमदार कामगिरीसाठी झिम्बॉब्वेचा कॅप्टन सिकंदर रझा याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला आहे.
झिम्बॉब्वेची दमदार कामगिरी
झिम्बॉब्वेच्या संघानं सिकंदर रझाच्या नेतृत्त्वात दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. झिम्बॉब्वेला यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या कामगिरीच्या जोरावर पुढील टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं आहे. झिम्बॉब्वेनं ऑस्ट्रेलिया, ओमान आणि श्रीलंकेला पराभूत केलं. तर, साखळी फेरीतील झिम्बॉब्वे विरुद्ध आयरलँड यांच्यातील सामना पावसामुळं होऊ शकला नाही. यामुळं झिम्बॉब्वेकडे 7 गुण झाले आहेत. ब गटात झिम्बॉब्वे पहिल्या स्थानावर आहे. तर, श्रीलंका 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
सुपर 8 मध्ये झिम्बॉब्वे समोर तगडं आव्हान
साखळी फेरीत झिम्बॉब्वेनं ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं आहे. आता सुपर 8 मधून पुढं जायचं असल्यास झिम्बॉब्वेला दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत यांचा सामना करावा लागेल. भारत आणि झिम्बॉब्वे यांचा सामना 26 फेब्रुवारीला होणार आहे. झिम्बॉब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर, झिम्बॉब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत 1 मार्चला होणार आहे. सुपर 8 मधून उपांत्य फेरी गाठायची असल्यास झिम्बॉब्वेला दमदार कामगिरी करावी लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.