कधी सचिन तेंडुलकरलाही घाम फोडणारा गोलंदाज… आज शाळेत-लग्नात गाणी म्हणत कुटुंबाचा गाडा ओढतोय; कोण
क्रिकेटच्या मैदानावर काही खेळाडू आपल्या पराक्रमामुळे अजरामर होतात, तर काही जण आपल्या आयुष्याच्या वेदनादायी कहाणीमुळे कायम स्मरणात राहतात. झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज हेन्री ओलंगा (Henry Olonga) या दोन्ही कारणांसाठी चर्चेत राहिला आहे. एकेकाळी त्याच्या बाऊन्सरने सचिन तेंडुलकरलाही अडचणीत टाकलं होतं, आणि आज तोच खेळाडू ऑस्ट्रेलियात छोट्या बारमध्ये, क्रूझ शिपवर आणि शाळांमध्ये गाणी गाऊन कुटुंबाचा गाडा ओढतोय आहे.
क्रिकेटपासून संगीतापर्यंतचा प्रवास
हेन्री ओलंगाला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. क्रिकेट कारकिर्दीतही तो गाणी लिहायचा, गुणगुणायचा. 2001 साली त्याने ‘Our Zimbabwe’ हे गाणं प्रदर्शित केलं. त्या काळात झिम्बाब्वेमध्ये राजकीय हिंसाचार शिगेला पोहोचला होता आणि रॉबर्ट मुगाबे सरकारवर गंभीर आरोप होत होते. या गाण्यात देशाविषयीचं दुःख आणि तरीही उरलेली आशा स्पष्टपणे दिसून येत होती.
काळी पट्टी बांधली अन् देश सोडण्याची वेळ…
2003 च्या विश्वचषकादरम्यान ओलंगा आणि अँडी फ्लॉवर यांनी मैदानात उतरताना हाताला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. हा निषेध देशातील लोकशाहीच्या दयनीय स्थितीविरोधात होता. मात्र या धाडसी भूमिकेची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. ओलंगाला जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या, संघाच्या बसमधून उतरवण्यात आलं आणि अखेर त्याला झिम्बाब्वे सोडावं लागलं. पुढे तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला.
ऑस्ट्रेलियात नवा संघर्ष
क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर ओलंगाने अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. गेल्या जवळपास दहा वर्षांपासून तो गाणं गाऊनच आपलं आयुष्य चालवत आहे. क्रूझ शिप, लहान गावं, शाळा, बार कधी प्रेक्षकांची संख्या अगदी मोजकी असते. ओलंगाचं स्वतःचंही मान्य आहे की ही एखाद्या गायकाच्या करिअरची सर्वोच्च पायरी नाही, पण हीच आज त्याची वास्तव परिस्थिती आहे.
जेव्हा सचिनही थक्क झाला होता
भारतीय चाहत्यांच्या स्मरणात ओलंगा आजही आहे, कारण 1998 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने आपल्या बाऊन्सरवर सचिन तेंडुलकरला बाद केलं होतं. हा विकेट इतका खास होता की नंतर समालोचन करताना अजय जडेजाने सांगितलं, त्या आऊटनंतर सचिन इतका अस्वस्थ झाला होता की पुढचा सामना येईपर्यंत त्याला नीट झोपही लागली नव्हती.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.