ममदानी पर्व, महासत्तेत परिवर्तनाची नांदी!
>> डॉ.जयदेवी पवार
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 2025 च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. हा विजय अमेरिकन राजकारणात नव्या दिशेचा संकेत मानला जात आहे. फक्त 34 वर्षांच्या या तरुण समाजवादी नेत्याने अब्जाधीशांच्या पसंतीविरुद्ध लढा देत अमेरिकेतील सर्वात मोठय़ा शहराचे नेतृत्व आपल्या हातात घेतले आहे. ममदानींनी संपत्तीतील प्रचंड विषमता, सार्वत्रिक बालसंगोपनासारख्या सामाजिक सुविधा आणि अब्जाधीशांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले. या भूमिकेमुळे अमेरिकेतील धनाढय़ वर्ग एकवटला. परिणामी, त्यांचे प्रतिस्पर्धी अँड्रय़ू युओमो यांना अब्जावधी रुपयांची देणगी मिळाली तरीही ममदानी यांनी जवळपास नऊ टक्क्यांच्या फरकाने निर्णायक विजय मिळवला.
निहित संदेश
ममदानी यांचा विजय एक गर्भित संदेश देणारा आहे. तो म्हणजे जागतिक महासत्ता आणि भांडवलशाहीची जननी असणाऱ्या अमेरिकेतील तरुण पिढी आता पारंपरिक आर्थिक मॉडेलपेक्षा समतेच्या आणि टिकाऊ जीवनशैलीच्या विचाराकडे वळत आहे. अर्थात, या विचारधारेविरुद्धचा आवाजही येणाऱ्या काळात अधिक तीव्र होणार आहे. रिपब्लिकन पक्ष आणि ट्रम्प समर्थक या नव्या ‘सोशॅलिस्ट’ प्रयोगाकडे धोक्याच्या नजरेने पाहताहेत.
न्यूयॉर्क या जगप्रसिद्ध महानगराने 2025 मध्ये एक ऐतिहासिक वळण घेतले आहे. 33 वर्षीय जोहरान ममदानी यांनी या शहराच्या महापौरपदाची निवडणूक जिंकून अमेरिकन शहरी राजकारणाच्या प्रवाहात एक नवीन विचारप्रवाह आणला आहे. ‘डेपॉटिक सोशलिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ठरले असून त्यांचे मूळ आफ्रिकन आणि दक्षिण आशियाई असल्याने ते बहुसांस्कृतिक अमेरिकेचे नवे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांचा विजय केवळ राजकीय परिवर्तन नाही, तर शहरी सामाजिक न्याय आणि आर्थिक समतेकडे झुकणारा नवा प्रयोगही आहे.
ट्रम्पवादाला विरोध
या विजयामुळे ट्रम्प समर्थक गटांमध्ये अस्वस्थता, भीती आणि विभाजनाचे स्वर उमटू लागले आहेत. कारण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष हा भांडवलशाही विचारांचा कट्टर समर्थक व ममदानी हे समाजवादी विचारांचे. भांडवलशाहीचे पुरस्कर्ते जितके आाढमक असतात, तितकेच भ्याडही. आपल्या साम्राज्याला छोटासा धक्का जरी लागला तरी त्यांचा तोल ढळतो आणि सर्वशक्तीनिशी ते असा धक्का देणाऱ्याच्या विरोधात उभे ठाकतात. ममदानींबाबतही हे घडताना दिसले. अमेरिकेतील अनेक भांडवलशहांनी जोहरान ममदानी यांच्या पराभवासाठी प्रयत्नांची शिकस्त केली.
भांडवलशहांना संदेश
ममदानींनी संपत्तीतील प्रचंड विषमता, सार्वत्रिक बालसंगोपनासारख्या सामाजिक सुविधा आणि अब्जाधीशांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले. या भूमिकेमुळे अमेरिकेतील धनाढय़ वर्ग एकवटला. परिणामी, त्यांचे प्रतिस्पर्धी अँड्रय़ू युओमो यांना अब्जाधीशांकडून अब्जावधी रुपयांची देणगी मिळाली. हेज फंड व्यवस्थापक बिल अॅकमन यांनी 1.75 दशलक्ष डॉलर, माजी महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांनी 8.3 दशलक्ष डॉलर, लॉडर आणि टिश कुटुंबांनी एकूण जवळपास 3.8 दशलक्ष डॉलर या मोहिमेत ओतले तरीही ममदानी यांनी जवळपास नऊ टक्क्यांच्या फरकाने निर्णायक विजय मिळवला. त्यांना विजयी करत न्यूयॉर्कच्या जनतेने ट्रम्प यांच्यासह सर्वच भांडवलशहांना योग्य तो संदेश दिला आहे.
या विजयाने डेपॉटिक पक्षातील पॉप्युलरिझम धोरणावर प्रहार झाला आहे. गेल्या काही वर्षांत डेपॉटिक नेत्यांनी मध्यममार्गी आणि उजव्या विचारसरणीला झुकणारी भूमिका स्वीकारली होती. त्यांनी धोरणांच्या मध्यबिंदूपर्यंत स्वतला मर्यादित ठेवत कामगार वर्ग आणि वंचित घटकांपासून दुरावा निर्माण केला होता, परंतु ममदानी यांनी या प्रचलित रणनीतीला नाकारून आर्थिक विषमतेविरुद्ध आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने स्पष्ट, प्रामाणिक भूमिका घेतली.
जोहरान ममदानी हे मूळचे युगांडामधील विद्वान महमूद ममदानी आणि भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांचे पुत्र आहेत. ‘मॉन्सून वेडिंग’सारख्या पुरस्कारप्राप्त चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेल्या मीरा नायर यांचा सामाजिक दृष्टिकोन आणि वडिलांची बौद्धिक विचारधारा या दोन्हींचा प्रभाव जोहरान यांच्यावर दिसतो.
ममदानी यांच्या प्रचार मोहिमेचे केंद्रबिंदू होते रोजच्या जगण्याचा खर्च आवाक्यात आणणे, भाडे स्थिर ठेवणे आणि सार्वजनिक वाहतूक मोफत करणे. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, शहरातील 1 दशलक्षाहून अधिक ‘रेन्ट-स्टॅबिलाइज्ड’ भाडेकरूंना पुढील काळात भाडेवाढ होणार नाही. तसेच गरीब आणि कामगार वर्गासाठी बससेवा मोफत करण्याचे त्यांचे आश्वासन होते. याशिवाय त्यांनी सरकारी मालकीची ग्रोसरी स्टोअर्स उभारण्याची योजनाही मांडली होती. यामुळे महागाई आणि अन्नसुरक्षेच्या समस्यांवर तोडगा निघू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. सर्वसमावेशक बालसंगोपन योजना आणि युनिव्हर्सल चाईल्डकेअर हेही त्यांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे आहेत.
नव्या कसोट्या
जोहरान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच प्रशासनाच्या स्वरूपाकडे लक्ष केंद्रित केले. त्यांनी पोलीस कमिशनर जेसिका टिश यांना कायम ठेवण्याचे संकेत दिले असून हा निर्णय प्रगतशील धोरणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा तोल राखण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे की, प्रगतशील विचारधारा आणि गुन्हेगारी नियंत्रण यांच्यात नेहमी संघर्ष होतो. त्यामुळे ममदानींसाठी ही सर्वात मोठी कसोटी ठरेल. तसेच सत्तेवर आल्यानंतर त्यांनी व्यापारी संघटना, नागरी गट आणि कामगार संघटनांसोबत संवाद सुरू केला आहे. हे त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे द्योतक आहे. मात्र या संवादासोबतच त्यांना वित्तीय वास्तव आणि राजकीय विरोध दोन्हींचा सामना करावा लागणार आहे.
राजकीय नाट्याच्या या पार्श्वभूमीवर जोहरान ममदानी यांच्या वैयक्तिक जीवनानेही माध्यमांचे लक्ष वेधले आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार त्यांनी आपली पत्नी रमा दुबाजी यांच्या सोबत दुबईत 22 डिसेंबर 2024 रोजी खासगी साखरपुडा आणि निकाह समारंभ पार पाडला होता. हा समारंभ विदा ाढाrक हार्बरच्या छतावर झाला, जिथून बुर्ज खलिफाचे सुंदर दृश्य दिसते. नंतर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये सिव्हिल समारंभ करून अधिकृत विवाह केला. रमा दुबाजी या सिरॅमिक आर्टिस्ट आणि इल्युस्ट्रेटर असून त्या फार क्वचितच माध्यमांशी संवाद साधतात. मात्र त्यांच्या सोशल मीडिया कौशल्यामुळे ममदानींच्या प्रचार मोहिमेला नवी ओळख मिळाली. प्रचार मोहिमेतील पिवळा-नारिंगी-निळा ही रंगसंगती, ठळक फॉन्ट आणि ब्रँडिंग हे सारे रमा यांच्या कौशल्यातून आकाराला आले.
अफॉर्डिबिलिटीचे नवे मॉडेल
ममदानींच्या धोरणांचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे अफॉर्डिबिलिटी अर्थात परवडणारे जीवनमान. भाडे नियंत्रण, मोफत सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी किराणा दुकाने यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल होऊ शकतात. काही अर्थतज्ञांच्या मते या योजनांमुळे अल्पकालीन आर्थिक भार वाढू शकतो, परंतु दीर्घकाळात या धोरणांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल. तथापि, विरोधकांचा दावा आहे की, या धोरणांमुळे संपन्न वर्ग आणि व्यवसाय समुदाय शहर सोडतील व यामुळे कर महसूल कमी होईल. आधीच झालेल्या सर्वेक्षणानुसार उच्च उत्पन्न गटातील 7 टक्के लोकांनी स्थलांतराची शक्यता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत ममदानी प्रशासनाने आर्थिक संतुलन राखणे आणि गुंतवणुकीला आकर्षित ठेवणे ही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागेल. यामध्ये त्यांच्या अभ्यासूपणाचा, नेतृत्वाचा कस लागणार आहे, पण सत्तेच्या राजकारणात अशा अनेक कसोट्या नेतृत्वाला पार पाडाव्याच लागतात. मूळ मुद्दा आहे तो म्हणजे ममदानी यांचा विजय हा अमेरिकेतील डाव्या विचारधारेच्या नव्या प्रवाहाचा प्रारंभ मानला जातो. बराक ओबामानंतरच्या काळात अमेरिकन डेपॉटिक पक्षातील प्रगतशील गटांनी, अलेक्झांड्रिया ओकासियो-कोर्टेज, बर्नी सँडर्स यांसारख्या नेत्यांनी सामाजिक न्यायावर आधारित राजकारणाला नवे रूप दिले होते. ममदानी हे त्या प्रवाहाचे शहरस्तरीय प्रतिबिंब आहेत.
पुढील वाटचाल आणि कसोटीचा काळ
ममदानी प्रशासनाने ट्रान्झिक्शन कमिटी स्थापन केली असून त्यात विविध क्षेत्रांतील तरुण, महिला आणि अल्पसंख्याक प्रतिनिधींचा समावेश आहे. पहिल्या 100 दिवसांत ठोस पावले उचलणे, हे या समितीचे लक्ष्य आहे, परंतु आव्हाने अनेक आहेत. रिपब्लिकन आणि सेंट्रिस्ट डेपॉट्स दोघेही त्यांच्या धोरणांवर शंका घेत आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निधी थांबवण्याची धमकी दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ममदानींना सुसंवाद, पारदर्शकता आणि परिणामकारक अंमलबजावणी यावर भर द्यावा लागेल. त्यांच्या धोरणांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास न्यूयॉर्क शहर सर्वसमावेशक विकासाचे प्रतिमान बनेल, परंतु जर असंतुलन, आर्थिक घसरण किंवा स्थलांतर वाढले, तर हा प्रयोग डाव्या विचारधारेसाठी उलट परिणाम देऊ शकतो. त्यामुळे येणारा काळ त्यांच्या नेतृत्वाचा कस लावणारा असणार आहे.
(लेखिका आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासक आहेत.)
Comments are closed.