आमदार सोपल बंगला आगप्रकरण, दोन आरोपींना चार दिवसांची कोठडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानावर विधान परिषद निवडणूक निकालाच्या मध्यरात्री पेटते फटाके टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना बार्शी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नागेश बाळू मोहिते व निखिल ऊर्फ अंबादास भारत रणझुंजारे अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, वरिष्ठ पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला केग दिला आहे. याप्रकरणी आमदार सोपल यांचे बंधू सुधीर गंगाधर सोपल (वय 78) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मध्यरात्री 1.15 वाजण्याच्या दरम्यान ते आपल्या निवासस्थानी झोपलेले असताना घराच्या पाठीमागील पॅव्हेलियन मैदानाच्या दिशेने पेटत्या अवस्थेतील फटाके घराच्या परिसरात येऊन पडू लागले. मोठय़ा आवाजामुळे जाग आल्यावर त्यांनी खिडकीतून पाहिले असता, परिसरातील काही झाडांना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी नागेश बाळू मोहिते व निखिल ऊर्फ अंबादास भारत रणझुंजारे (दोघेही राऊत चाळ, बार्शी) यांना अटक केली होती.

दोन्ही आरोपींना न्यायाधीश पी. व्ही. राऊत यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव व सरकारी पक्षाने आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपींच्या वतीने ऍड. महेश जगताप यांनी बचाकात्मक बाजू मांडताना आरोपींची राजकीयदृष्ट्या गुन्ह्यात नावे घेतल्याचा युक्तिवाद केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 29 जूनपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी सरकारी वकील ऍड. राहुल काजळे, फिर्यादी पक्षाचे ऍड. विकास जाधव तसेच तपास अधिकारी एपीआय बाळासाहेब जाधव उपस्थित होते.

Comments are closed.