केस लागली की शिंदे दरे गावात का पळतात? आदित्य ठाकरे यांचा टोला
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीची तारीख लागली की त्याच कालावधीत शिंदे साताऱयाच्या दरेगावात का पळतात, असा उपहासात्मक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बिल्डरांच्या नादी लागून क्लस्टर योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेले अशी टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केली होती. त्याबाबत पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, मंत्र्यांकडे खूप डेटा असतो, नाईक यांनी म्हटलेले खरेही असेल, शिंदे यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर माणुसकीला शेकडो वर्षे मागे नेले.
मुंबईतील फुटबॉलचे मैदान वाचवण्यासाठी फुटबॉलपटूंनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. फुटबॉलचे मैदान भाजपच्या कंत्राटदारांच्या खिशात टाकू नका अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे. शिवसेनेचाही मैदान वाचवण्यासाठी लढा सुरू असून महानगरपालिकेतही शिवसेनेचे नगरसेवक या मुद्दय़ावरून विरोध करतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
फडणवीसांनी मेस्सीलाही फसवले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही यावेळी आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. जागतिक ख्यातीचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीबरोबर सेल्फी घ्यायला मुख्यमंत्री फडणवीस यांनी महादेवा प्रोजेक्ट सुरू केला होता, तो बंद झाला आहे, असे करून फडणवीस यांनी मेस्सीलाही फसवले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मोठमोठे खेळाडू मेस्सीला फसवू शकत नाही, पण फडणवीसांनी फसवले, असे ते म्हणाले.
Comments are closed.