टक्केवारीमुळेच मुंबई-गोवा महामार्ग 17 वर्षे रखडला, राज ठाकरे यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी
राज्यातील महत्त्वाचा मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेप आणि टक्केवारीमुळेच रखडला असल्याचा आरोप आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. या महामार्गाची पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची आणि सत्ताधाऱयांची कानउघाडणी केली.
गेली 17 वर्षे या मार्गाचे काम सुरू असून सर्वसामान्य प्रवाशांना वेठीला धरले जात आहे. अनेक पंत्राटदार आले आणि गेले, काही तर चक्क पळूनही गेले. आता हा मार्ग पूर्ण होणार तरी केव्हा असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर गाडी चालवून माणगाव बायपासची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. तसेच या कामाची माहिती घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी स्वतः मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात होणाऱया विलंबाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी कॉण्ट्रक्टर कंटाळून निघून गेले असल्याचे सांगितले. गडकरी हे रस्ते विभागाचे मंत्री आहेत. त्यामुळे हे कंत्राटदार नेमके कोणाला कंटाळून पळून गेले असा प्रश्नही त्यांनी केला.
सत्ताधाऱयांना जोरदार धक्का द्या
नवीन रस्ते बांधल्यानंतर काही काळातच ते खराब होणार असतील तर त्याचा नेमका फायदा कुणाला होणार आहे? वर्षानुवर्षे कोकणातील स्त्यांची कामे रखडली असून या कामांमध्ये दिवसेंदिवस राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. टक्केवारीचा तर जोरात खेळ सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, जनतेने जागरूक राहणे आवश्यक असून नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारल्याशिवाय बदल होणार नाही. या सत्ताधाऱयांना जोरदार धक्का द्या असे आवाहनही त्यांनी केले.
तिसरी मुंबई कुणासाठी?
रायगडमध्ये तिसरी मुंबई उभारण्याचा घाट सरकारने घातला आहे. तेथे एज्युकेशन हब, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स क्लब, डेटा सेंटर, संशोधन केंद्रे, आंतरराष्ट्रीय विद्यापीठे असे प्रकल्प येणार आहेत. कोकणातील किती तरुणांना तिथे नोकऱ्या मिळणार, याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे ही तिसरी मुंबई नेमकी कुणासाठी, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
Comments are closed.