जंतर-मंतरवर जोरदार धुमश्चक्री – तरुण भारत
राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात-सुटका : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात बुधवारी पुन्हा मोठे आंदोलन करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विरोधी खासदारांसह तीन बसमधून जंतर-मंतरकडे रवाना होत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनाही ताब्यात घेतल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली.
काँग्रेसने सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनावेळी पुन्हा अशांतता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या आंदोलनादरम्यान संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत जंतर-मंतरवरील आंदोलन रोखण्यात आले. जंतरमंतरवर धडक देण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यापूर्वी सागर रत्ना रेस्टॉरंटमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजनानंतर सायंकाळच्या सुमारास सर्व काँग्रेस नेते जंतरमंतरच्या दिशेने रवाना झाल्यानंतर त्यांना अटकाव केल्याने सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाल्याचे निदर्शनास आले.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
बैठकीदरम्यान रेस्टॉरंटबाहेर तीन बस दाखल झाल्या होत्या. विरोधी पक्षाचे खासदार एकेक करून बसमध्ये चढले. दरम्यान, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार बसमध्ये चढून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी इंडिया आघाडीचे खासदार जंतरमंतरवर पोहोचणार असल्यामुळे तेथे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.
एफआयआर मला पदकांसारखे : राहुल गांधी
ज्ञानेश कुमार हे देशाचे कायदेशीर मुख्य निवडणूक आयुक्त नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना केला. आम्ही आंदोलनासाठी जंतरमंतरवर जात आहोत. सध्या 45 एफआयआर आहेत, पण त्यांची संख्या 100 झाली तरी काही फरक पडत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. सर्व एफआयआर माझ्यासाठी पदकांसारखे आहेत. पण ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल, असेही त्यांनी जाहीर केले. राहुल गांधी यांनी जंतर मंतरकडे जात असताना मोदी, शाह आणि ज्ञानेश कुमार यांनी लोकशाही नष्ट केल्याचा दावाही केला.
दिल्ली पोलीस सतर्क
इंडिया आघाडीच्या बैठकीदरम्यान रेस्टॉरंटबाहेर तीन बस दाखल झाल्या असताना मंगळवारच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनीही आपली सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. वास्तविक, काल राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढत होते, परंतु त्यांना आकाशवाणी भवन येथे थांबवण्यात आले. यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आकाशवाणी भवनच्या आवारात नऊ तास धरणे आंदोलन केले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर सोडून देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्यांनी ताब्यात घेऊन सोडण्यात आले.
……….
Comments are closed.