तामिळनाडूतील 'लोकनेत्या'चा करिष्मा

अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाची प्रचंड आघाडी : पहिल्याच निवडणुकीत ‘मास्टरस्ट्रोक’ : सर्वत्र जल्लोष

तामिळनाडूच्या राजकारणाला एक नवा सुपरस्टार मिळाला आहे. थलपथी विजय यांनी मिळविलेल्या प्रचंड विजयाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून निर्माण झालेली पोकळी भरून काढली आहे. चित्रपट तारकेपासून राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचलेल्या जयललिता यांचे 2016 मध्ये आणि करुणानिधी यांचे 2018 मध्ये निधन झाल्यापासून ही जागा रिक्त होती. ‘टीव्हीके’च्या या दमदार एन्ट्रीमुळे गेल्या 49 वर्षांपासून राज्याच्या राजकारणातील द्रविड राजकारणाचे वर्चस्व आता संपुष्टात येत असल्याचे दिसते.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वांनाच धक्का देणारे ठरले आहेत. 234 जागा असलेल्या तामिळनाडूनेही ह्या निवडणुकीत रंगत आणली. एका संस्थेचा अपवाद वगळता इतर संस्थानी अण्णाद्रमुकच्या नेतृत्वातील रालोआ विजयी होईल, असे अनुमान काढण्यात आले होते. चार संस्थांनी द्रमुक आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा निष्कर्ष काढला होता. तर दोन संस्थांनी या राज्यातील सत्तांतर होऊन अण्णाद्रमुकच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येईल, असा निष्कर्ष काढला होता. याचदरम्यान केवळ एका सर्वेक्षण संस्थेने अभिनेता विजय याचा टीव्हीके हा पक्ष सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून समोर येईल आणि विधानसभा त्रिशंकू असेल, असे भाकित केले होते. एक एक्झिट पोल अंदाज अचूक ठरला असून उर्वरित अंदाज जवळपास चुकीचे ठरले.

मतमोजणीला सुरुवात होताच अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेट्री कझगम’ (टीव्हीके) पक्षाने विजयी घोडदौड सुरू केल्याचे दिसून आले. पेरांबूर आणि त्रिची पूर्व या डीएमकेच्या बालेकिल्ल्यांमधून चंचूप्रवेश केलेल्या विजय यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयाद्वारे तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण भारतीय सिनेमाचा सुपरस्टार थलपथी विजयने राजकारणात प्रवेश केला, तेव्हा तो केवळ एका स्टारचा प्रवेश मानला गेला. मात्र, 2026 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील दमदार एन्ट्रीने त्याचा राजकारणातील प्रवेश केवळ शक्तिशालीच नाही, तर अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने आपल्या पहिल्याच निवडणुकीत 100 हून अधिक जागा जिंकून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

एम. के. स्टॅलिन पराभूत

तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आणि द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी आपली कोलाथूर जागा गमावली आहे. ही जागा त्यांचा बालेकिल्ला मानली जात होती. याठिकाणी त्यांनी 2011, 2016 आणि 2021 मध्ये सातत्याने विजय मिळवला होता. विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे दीर्घकाळचे सहकारी व्ही. एस. बाबू यांनी त्यांचा पराभव केला. व्ही. एस. बाबू पूर्वी द्रमुकमध्ये होते. 2011 मध्ये त्यांनी कोलाथूर जागेसाठी स्टॅलिन यांचे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले होते. नंतर त्यांनी पक्ष सोडला आणि एआयएडीएमकेमध्ये प्रवेश केला, आणि त्यानंतर 7 फेब्रुवारी 2026 रोजी टीव्हीकेमध्ये सामील होऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि हा प्रचंड विजय मिळवला.

 

थलपथी विजय यांचा ‘सुरक्षित डाव’

‘टीव्हीके’चे बहुतेक उमेदवार राजकारणात नवीन असल्याने पेरांबूर आणि तिरुची पूर्व जागांवर विशेष लक्ष केंद्रित झाले होते. विजय यांच्या विरोधकांनी दोन जागांवरून निवडणूक लढवण्याच्या त्याच्या निर्णयावर ‘अविचारी’ पाऊल म्हणून टीका केली होती. तसेच याला ‘सुरक्षित डाव’ खेळण्याचा प्रयत्न म्हटले होते. मात्र, यातून विजय जयललिता यांच्या रणनीतीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसले. जयललितांना तामिळनाडूच्या उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी 1991 मध्ये बरगुर आणि कांगेयम या दोन जागांवरून निवडणूक लढवली होती. पेरांबूर आणि तिरुची पूर्व हे दोन्ही शहरी आणि निमशहरी भाग आहेत, याचा अर्थ येथील मोठी लोकसंख्या विजयच्या समर्थकांमध्ये सामील होऊ शकते, ज्यामुळे त्यांची मते प्रत्यक्षात मतदानात बदलू शकतात. पेरांबूर हा प्रामुख्याने कामगार वर्गाचा परिसर मानला जातो, तर तिरुची पूर्वमध्ये ख्रिश्चन मतदारांचा मोठा वर्ग आहे. या दृष्टिकोनातून पाहिल्यास, ‘थलपथी’ विजयच्या दोन्ही जागा जिंकण्याच्या संधी बळकट करण्यासाठी ही एक हेतुपुरस्सर आखलेली रणनीती असल्याचे दिसते.

थलपथी विजयनी दिलेली महत्त्वाची आश्वासने

टीव्हीकेच्या अनपेक्षित यशामागे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने, ज्यात थेट सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात आल्या होत्या. विजय यांनी आपली रणनीती भावनिक आवाहन तसेच आर्थिक मदतीवर केंद्रित केल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाशी जोडले जाण्यास मदत झाली.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर

पक्षाचे सर्वात लोकप्रिय आश्वासन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे होते. याअंतर्गत, घरातील महिला प्रमुखासाठी निश्चित मासिक आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे महिला मतदारांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत झाली. याव्यतिरिक्त मोफत बस प्रवास आणि इतर घरगुती योजनांद्वारे महिलांचे जीवन सुकर करण्याचा संदेश देण्यात आला.

घरगुती खर्च कमी करण्याचे उपक्रम

टीव्हीकेने स्वयंपाकघरातील खर्च कमी करण्यासाठी एक मोफत वार्षिक गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले. ही योजना विशेषत: मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी तयार करण्यात आली होती. याचाही निवडणुकीच्या चित्रावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला.

शिक्षण आणि तरुणांवर लक्ष

विजय यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली, जेणेकरून निधीअभावी कोणत्याही मुलाचे शिक्षण खंडित होणार नाही. तरुणांना आकर्षित करण्यासाठी बेरोजगारी भत्ता योजना आणि  सुशिक्षित तरुणांना मासिक आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेज

शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी टीव्हीकेने कर्जमाफीचे मोठे आश्वासन दिले. लहान शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी अंशत: मदतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामुळे पक्षाला ग्रामीण भागात मोठा पाठिंबा मिळाला.

सामाजिक योजनांशी जोडणी

याव्यतिरिक्त विवाहासाठी आर्थिक मदत आणि पारंपरिक भेटवस्तू यांसारख्या योजनांनीही लक्ष वेधून घेतले. या आश्वासनांमुळे केवळ आर्थिक मदतीचीच खात्री झाली नाही, तर सामाजिक सहभागही मजबूत झाला.

पहिल्याच प्रयत्नात मोठी झेप

तामिळनाडूच्या राजकारणातील प्रस्थापित पक्षांमध्ये टीव्हीकेचा उदय हे एक महत्त्वपूर्ण चिन्ह आहे. योग्य रणनीती आणि मजबूत जनसंपर्क असल्यास, एक नवीन पक्षसुद्धा मोठा प्रभाव पाडू शकतो, हे विजयने सिद्ध केले आहे. या फायद्याचे निकालांमध्ये कितपत रुपांतर होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, पण एक गोष्ट निश्चित आहे की थलपथी विजय आता केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर राजकारणातही एक प्रमुख खेळाडू बनला आहे.

तामिळनाडूचा नवा ‘राजकीय सुपरस्टार’

गेल्या 49 वर्षांपासून चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार हे राजकारणाचेही ‘हिरो’ राहिले आहेत. एम. करुणानिधी, सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता या नावांव्यतिरिक्त तामिळनाडूच्या राजकारणात अशी अनेक नावे आहेत ज्यांनी या दक्षिण भारतीय राज्यात दीर्घकाळ आपले मजबूत राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले आहे. एम. के. स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे तमिळ चित्रपटसृष्टीशी संबंधित असले तरी, त्यांना कॉलीवूडमधील पूर्वीच्या कलाकारांइतकी लोकप्रियता मिळवता आलेली नाही. मात्र, थलपथी विजय यांच्या करिष्म्याने त्यांना तमिळ चित्रपटसृष्टीतून राजकीय सुपरस्टार बनवले.

थलपथी विजय यांची पार्श्वभूमी

थलपथी विजक किंवा सी. जोसेफ विजय, जे जोसेफ विजय चंद्रशेखर या नावानेही ओळखले जातात. त्यांचा जन्म 22 जून 1974 रोजी झाला. त्यांचे वडील, एस. ए. चंद्रशेखर एक चित्रपट निर्माते असून त्यांची आई शोभा चंद्रशेखरही हिंदू असून त्यांनी चित्रपटांमध्ये पार्श्वगायिका म्हणून काम केले आहे. विजय हे तामिळनाडूतील वेल्लार समाजाचे आहेत. हा एक समृद्ध कृषीप्रधान समाज असून त्यात हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मांच्या सदस्यांचा समावेश आहे.

Comments are closed.