दिल्लीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू – TMarathiNews

पीजी-हॉस्टेलमधील विद्यार्थी अडकल्याची भीती : मदत-बचावकार्याला गती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत रविवारी मुसळधार पावसात एक मोठा अपघात घडला. दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात तीन मजली इमारत अचानक कोसळली. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये पीजी-हॉस्टेल असल्यामुळे तेथे वास्तव्यास असलेले अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त झाल्याने मदत व बचावकार्य गतिमान करण्यात आले. सायंकाळपर्यंत ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश दिले. तसेच या दुर्घटनेप्रकरणी संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मोती बाग येथील सत्य निकेतन परिसरातील शिव मंदिराच्या जवळ घडला. इमारत अचानक कोसळल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाला रविवारी दुपारी 1:33 वाजता अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्यास सुरुवात केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहा जणांना ढिगाऱ्याखालून जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले आहेत हे नेमके स्पष्ट झालेले नाही. सध्या मदत व बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे.

इमारतीत वसतिगृह कार्यरत

प्राथमिक माहितीनुसार, कोसळलेल्या इमारतीत वसतिगृह होते. ढिगाऱ्याखाली विद्यार्थी अडकल्याच्या शक्यतेने चिंता वाढली. मात्र, अपघातावेळी इमारतीत किती विद्यार्थी किंवा इतर लोक उपस्थित होते, हे प्रशासनाने तातडीने स्पष्ट केलेले नाही. सत्य निकेतन दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण कॅम्पसजवळ आहे. या परिसरात मोठ्या संख्येने पीजी आणि वसतिगृहे आहेत. त्यामुळेच या अपघातामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

जवळच्या इमारती केल्या रिकाम्या

खबरदारीचा उपाय म्हणून, अपघातानंतर जवळच्या काही इमारतीदेखील रिकाम्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय पथके परिसरातील इतर इमारतींच्या सुरक्षिततेचीही तपासणी करत आहेत. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. परिणामी, इमारत कोसळल्यानंतर प्रशासन आजूबाजूच्या इमारतींबाबत अतिरिक्त खबरदारी घेत आहे. अपघाताच्या कारणाबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

घरमालकावर गुन्हा, चौकशीसाठी समिती

दक्षिण दिल्लीचे भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईबद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी या घटनेला अत्यंत दुर्दैवी म्हटले आहे. इमारतीच्या मालकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे खासदार बिधुरी यांनी सांगितले. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल प्रसिद्ध होताच, दोषी आढळलेल्या कोणावरही कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोसळलेली इमारत अलीकडेच बांधलेली नसून खूप जुनी होती, असेही ते पुढे म्हणाले.

Comments are closed.