‘फिफा’मध्ये सत्तासंघर्ष पेटला! वर्ल्ड कप विक्रीच्या वादग्रस्त योजनेवर यूईएफए न्यायालयात जाणार

‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्या वर्ल्ड कपच्या भविष्यातील नफ्यातील हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विकण्याच्या वादग्रस्त योजनेवर अखेर युरोपियन फुटबॉल महासंघाने (यूईएफए) कायदेशीर अस्त्र उगारले आहे. प्रस्ताव मागे घेतल्यानंतरही ‘यूईएफए’ने ‘फिफा’ला संभाव्य न्यायालयीन लढाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत, त्यामुळे जागतिक
फुटबॉलच्या सत्ताकेंद्रात अभूतपूर्व संघर्ष पेटला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ‘फिफा’ने या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, ई-मेल, डिजिटल नोंदी आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवावेत, अशी कायदेशीर सूचना ‘यूईएफए’ने दिली आहे. पुरावे नष्ट करणे, बदलणे किंवा लपविण्याचा कोणताही प्रयत्न न्यायालयीन प्रक्रियेत गंभीर मानला जाईल, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.

इन्फँटिनो यांनी भविष्यातील विश्वचषकाच्या उत्पन्नातील हिस्सा विकून सुमारे 4.2 अब्ज डॉलर्स उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. न्यूयॉर्पस्थित गुंतवणूक कंपनीसह काही खासगी गुंतवणूकदारांना यात सहभागी करण्याची योजना होती. मात्र, जगभरातून तीव्र विरोध झाल्यानंतर हा प्रस्ताव मागे घ्यावा लागला.

या प्रस्तावाविरोधात ‘यूईएफए’च्या 55 सदस्य संघटनांनी एकमताने भूमिका घेत ‘फिफा’च्या सर्व स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर ‘यूईएफए’ने आता कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली असून मध्यस्थी, नियामक तक्रारी आणि न्यायालयीन लढाईचे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. या प्रकरणात ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो, मुख्य वित्त अधिकारी थॉमस पेयर आणि जागतिक फुटबॉल विकास प्रमुख आर्सेन वेंगर यांच्यासह 18 वरिष्ठ अधिकाऱयांची नावे नोटिशीत नमूद करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Comments are closed.