शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद; निवड समितीने दिला मोठा संकेत, गौतम गंभीर यांचेही दुर्लक्ष
टीम इंडियाचा एकेकाळचा हुकमी एक्का असलेल्या मोहम्मद शमीची संघात एंट्री कधी होणार, याची उत्सुकता सर्वांना होती. पण आता शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचे समोर आले आहे. कारण निवड समितीने याबाबतचा मोठा संकेत दिला आहे. गौतम गंभीर यांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
बुमराच्या जागी नबीला संधी
जसप्रीत बुमरा तंदुरुस्त नसल्यामुळे श्रीलंकेविरुद्धचे दोन आणि इंग्लंडविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामनाही खेळू शकला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आकिब नबीला बुमराच्या जागी कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. जम्मू आणि कश्मीरचा रहिवासी असलेला नबी गेल्या दोन रणजी ट्रॉफी मालिकांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.
रणजी ट्रॉफीमध्ये 37 विकेट्स
फिटनेसच्या समस्यांमुळे मोहम्मद शमीची निवड होत नाही, असे सुरुवातीला म्हटले जात आहे. पण तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आहे. गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 7 सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेतले, ज्यामध्ये तीन वेळा पाच बळी घेण्याच्या कामगिरीचा समावेश आहे. शमीने 7 सामन्यांतील 13 डावांमध्ये 230.3 षटके गोलंदाजी केली. आयपीएल 2026 मध्ये शमीने 13 सामन्यांमध्ये 12 फलंदाजांना बाद केले.
कसोटी क्रिकेटमधील दमदार कामगिरी
या महिन्यापासून सुरू होणाऱया दुलीप ट्रॉफीसाठी मोहम्मद शमीचा पूर्व विभागीय संघात समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या आपल्या 64 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत शमीने 229 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये सहा वेळा पाच बळी घेण्याच्या कामगिरीचा समावेश आहे. एका सामन्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी 118 धावांत 9 बळी ही आहे. त्याने केवळ 108 एकदिवसीय सामन्यांमध्ये 206 बळी घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यात 7 बळी घेणारा शमी हा एकमेव हिंदुस्थानी गोलंदाज आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 16 वेळा चार बळी घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट
नबीला हिंदुस्थानच्या संघात स्थान मिळाले असले तरी हा निर्णय मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट मानला जात आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने 35 वर्षीय शमीकडे बऱयाच काळापासून दुर्लक्ष केले आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला. 2023 पासून त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी देण्यात आलेली नाही. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल या दोन्हीमध्ये सातत्याने खेळूनही टीम इंडियामध्ये त्याच्या पुनरागमनाचा दरवाजा जवळजवळ बंद झाला आहे.
Comments are closed.