मराठी सक्तीवर सरकार हलेडुले! आज पुन्हा बैठक, निर्णय होणार काय, अमराठींच्या दबावापुढे महायुतीची फरफट आणि सरपट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रिक्षा आणि टॅक्सीचालकांना महाराष्ट्र दिन अर्थात 1 मेपासून मराठी सक्ती करण्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्तावही परिवहन विभागाने गृह विभागाकडे पाठवला. मात्र आता या सक्तीची अंमलबजावणी करण्याबाबत महायुती सरकारचे हलेडुले सुरू आहे. मराठी सक्ती होणारच असे छातीठोकपणे सांगणाऱ्या सरकारची अमराठींच्या दबावापुढे फरफट होत आहे. रिक्षा-टॅक्सीचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत आपल्या निर्णयावर ठाम राहण्याऐवजी परिवहन मंत्र्यांची त्यांच्यासमोर सरपट झाल्याचे दिसले. संघटनांनी मराठी शिकण्यासाठी मुदत मागितली आणि परिवहन मंत्र्यांनीही त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला. उद्या पुन्हा एक बैठक होणार आहे आणि त्यात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येत असले तरी या मुद्द्यावरून सरकारची अवस्था पाहता निर्णय होणार का अशीच शंका उपस्थित केली जात आहे.

कोणाचाही रोजगार जाऊ नये

मराठी बोलता येत नसेल तर त्याचा परवाना रद्द केला जाईल, असा सरकारचा निर्णय आहे. मात्र त्या निर्णयाशी विसंगत विधान परिवहन मंत्र्यांनी केले. कुणाचाही रोजगार जाऊ नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे ते म्हणाले. भविष्यात ओला, उबर आणि रॅपिडो चालकांसाठीही असाच निर्णय घेणार असल्याचे सूतोवाचही सरनाईक यांनी केले.

मराठी शिकण्यासाठी तीन महिने ते एक वर्षाची मुदत द्या!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज रिक्षा व टॅक्सीचालक संघटनांच्या नेत्यांची मंत्रालयात बैठक बोलवली होती. त्यात संघटनांनी मराठी शिकण्यासाठी 3 महिने ते एक वर्ष इतकी मुदत देण्याची मागणी केली. मात्र महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलेच पाहिजे, मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देता येऊ शकेल पण मराठी सक्ती होणारच, असे रिक्षा-टॅक्सीचालक संघटनेच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितल्याचा दावा सरनाईक यांनी केला. पण आजच्या बैठकीतच मुदत देण्याबाबत निर्णय घेण्याऐवजी त्यांनी उद्या पुन्हा बैठक बोलवली.

4 मेचा संप स्थगित

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी किमान व्यवहारीक मुद्द्यावर बोलता आले पाहिजे असा सरकारचा आग्रह आहे. त्यासाठी मुदत देण्यासही सरकार सकारात्मक आहे. मराठी सक्तीची अंमलबजावणी पुढे ढकलून 15 ऑगस्टपासून लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे येत्या 4 मे रोजी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय आज गोरेगाव येथे रिक्षा व टॅक्सी चालकांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले.

1 मेपासून मराठी सक्तीची अंमलबजावणी न करण्याचे तोंडी आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याची माहितीही शंशांक राव यांनी दिली.

सरकारने कारवाई जरूर करावी पण ती रोहिंग्या बांगलादेशी असतील त्यांच्यावर करावी, त्यांना परवाने देणाऱ्या अधिकाऱयांवर करावी, असे राव यांनी सांगितले.

Comments are closed.