हिंमत असेल तर केईएमचे नाव बदलून दाखवा! शिवसैनिकांची रुग्णालयावर धडक, प्रस्ताव मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरणार
केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ‘काwशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याच्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीने प्राथमिक मंजुरी दिल्याचे समजताच शिवसेना आक्रमक झाली आहे. मुंबईची अस्मिता आणि इतिहास पुसू देणार नाही, हिंमत असेल तर केईएमचे नाव बदलून दाखवा, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. या नामांतराविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
केईएमचा इतिहासच पुसण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्ष करत आहे. ब्रिटिशकालीन नाव असून ते बदलून ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे नाव ठेवल्यास त्याचे संक्षिप्त रूप ‘केईएम’ हेच कायम राहील, असा दावा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. शिवसेनेने त्याला तीव्र विरोध केला असून आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केईएमवर धडक दिली. यावेळी शिवडी विधानसभेच्या वतीने अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळामध्ये शिवसेना सचिव सुधीर साळवी, नगरसेवक सचिन पडवळ, किरण तावडे, श्रद्धा जाधव, श्रद्धा पेडणेकर, सुप्रिया दळवी, उर्मिला पांचाळ, अबोली खाडे, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, गौरी चौधरी, पवन जाधव, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, मिनार नाठळकर, जयसिंग भोसले आदी उपस्थित होते.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आज स्वाक्षरी मोहीम
केईएमच्या नामांतराला विरोध दर्शवण्यासाठी 28 एप्रिल रोजी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मुंबईकरांनी त्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सुमारे 1 कोटी मुंबईकरांच्या स्वाक्षऱया घेऊन पालिका आयुक्तांकडे देण्यात येणार आहे.
हिटलरशाहीने प्रस्ताव मंजूर केला – किशोरी पेडणेकर
हिटलरशाही पद्धतीने विरोधी पक्षांनाही न विचारता प्रस्ताव मंजुरीचा घाट केला गेला. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची भाजपची मानसिकता असेल तर त्याला सामोरे जाण्यास शिवसेना तयार आहे याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, असा इशारा यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिला.
…मग इतर ऐतिहासिक वास्तुंचीही नावे बदलणार का? – मिलिंद नार्वेकर
शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केईएमच्या नामांतरप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. केईएमचे नाव बदलत असाल तर उद्या मुंबईतील इतर ऐतिहासिक वास्तुंचीही नावे बदलणार का, असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे.
लोढा यांनी केईएमचे नाव बदलण्यापेक्षा त्यांनी बांधलेल्या टोलेजंग टॉवरपैकी एका टॉवरमध्ये धर्मादाय रुग्णालय सुरू करावे आणि त्याला काwशल्यश्रेष्ठ एकलव्याचे नाव द्यावे, असे चौधरी यावेळी म्हणाले.
Comments are closed.