जेपीएससीच्या माजी अधिकाऱ्याला अटक

माजी जेपीएससी अधिकाऱ्याला अटक

वृत्तसंस्था

रांची (झारखंड)

झारखंडमधील भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात प्रक्षुब्ध झालेले विद्यार्थी उग्र आंदोलन करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारच्या सीआयडीकडून झारखंड जनसेवा आयोगाचे (जेपीएससी) माजी अध्यक्ष एल. खियांगते यांना अटक करण्यात आली आहे. विद्यार्थी आंदोलनामुळे हे पाऊल उचलणे झारखंड सरकारला भाग पडल्याचे दिसून येते. या आयोगाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात भष्टाचार आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर खियांगते यांनी पदाचा त्याग केलेला होता. त्यानंतर त्यांची सीआयडी चौकशी करण्यात आली. सातवेळा त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर आता अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना मंगळवारी न्यायालयात उपस्थित करून कोठडी घेण्याचा सीआयडीचा विचार आहे.

व्यापक धाडसत्र

खियांगते यांच्या कार्यालयावर आणि घरांवर सीआयडीकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. या धाडींमध्ये अनेक संशयास्पद कागदपत्रे, ओआरएम शीट्स आणि इतर पुरावे हस्तगत करण्यात आले. डिजिटल साधनसामग्रीही जप्त करण्यात आली. या आधारावर त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी सर्व आरोप नाकारले आहेत.

खासगी कंपनीला कंत्राट

जेपीएससी परीक्षा घेण्याचे कंत्राट या आयोगाने टीडीपीएल नामक खासगी संस्थेला दिले होते. हे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात कंपनीकडून खियांगते आणि अन्य काही अधिकाऱ्यांना पैसा मिळाल्याचा सीआयडीचा संशय आहे. या प्रकरणात एका संगणक चालकालाही काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली आहे. हे प्रकरण जेपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकाराशीही संबंधित आहे.

विद्यार्थ्यांशी सहकार्य करा

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर राग न धरता त्यांच्याशी पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन झारखंडमधील सत्ताधारी युतीतील झारखंड लोकतांत्रिक क्रांतीकारी मोर्चाचे (जेएलकेएम) आमदार जयराम कुमार महातो यांनी केले आहे. हा झारखंडच्या राज्य सरकारला घरचा आहेर मानण्यात येत आहे. या राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या युतीचे सरकार असून त्याला अन्य काही पक्षांचे समर्थन प्राप्त आहे.

Comments are closed.